उरण : भेंडखळ हद्दीमधील नाल्यांमधून येथील खोपटा खाडीमध्ये घातक रसायन सोडण्यात येत असून, या रसायनांमुळे येथील पर्यावरणाला व जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. आशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधितावर कारवाईची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
खाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या नाल्यामध्ये काही अज्ञातांकडून घातक रसायन सोडण्यात आले आहे. या रसायनांचा उग्र वास येथील परिसरात पसरत असून, येथील नाल्यातील रसायन हे खोपटा खाडीमध्ये भरती ओहोटीच्या पाण्यासोबत पसरत असल्याने येथील खाडीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे येथील खारफुटी नष्ट होऊ लागली आहे.
तक्रार आल्यास कारवाई
या संदर्भात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार असल्यास पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले तर उरण विभागाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रवीण पाटील यांनी अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विभागात नियमित पाहणी केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.