नवी मुंबई शहर उभारणीत ९५ गावांमध्ये असलेली मोकळी मैदाने शहरीकरणाच्या जाळ्यात अडकली आहेत तर गावातील तरुणांसाठी असलेली मैदाने नामशेष झाली आहेत. जत्रा, लग्न सभारंभ, सभा सभांरभ सारखे पारंपरिक कार्यक्रम पूर्वी या मैदानांवर होत असत ते कार्यक्रम आता प्रकल्पग्रस्तांना भाडय़ाने सभागृह घेऊन करण्याची वेळ आल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली होती. ती शांत करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून तळवली घणसोली येथील सेक्टर २१ मधील मैदानाच्या सिडकोने काढलेल्या निविदेला स्थगिती दिली आहे. प्रकल्पग्रस्त खेळाडूंना पर्यायी मैदाने दिल्याशिवाय हे भूखंड विकासकांना विकण्यात येऊ नयेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे ९५ गावांशेजारच्या जमिनीबरोबर मैदाने संपादित करणाऱ्या सिडकोला चांगलीच चपराक बसली आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून सिडकोने ४५ वर्षांपूर्वी ९५ गावांशेजारच्या १६ हजार हेक्टर जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना अनेक सेवासुविधांची गाजरे दाखवली होती. त्यात अद्ययावत मैदानांचाही समावेश होता. ती सिडकोने आतापर्यंत कधीच पूर्ण केली नाहीत. गावठाण विस्तारसारख्या योजना वेळीच न राबविण्यात आल्याने सिडकोला विकलेल्या जमिनीच पुन्हा भूमाफियांना विकल्याने वीस हजारपेक्षा जास्त बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली. त्यामुळे ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या त्यांचे जीवनमान उंचविण्याचा म्हणावा असा प्रयत्न केला गेला नाही. नवी मुंबई विमानतळ सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहात असल्याने अलीकडे प्रकल्पग्रस्तांच्या सर्वागिण विकासाचा विचार केला जात आहे पण हा विचार यापूर्वी केला गेला नाही. त्यामुळेच गावाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांचादेखील लिलाव करून ती विकण्यात आली असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे निविदाद्वारे विकण्यात आलेल्या मैदानांच्या भूखंडांना करावे, दारावे, तळवली, घणसोली या गावात कटाक्षाने विरोध झाला. करावे गावाजवळील  मैदान तर हेलिपॅडसाठी राखीव करण्यात आले होते. तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या मैदानांवर ग्रामस्थांनी आपल्या मुलांना विविध खेळ खेळताना पाहिले होते तर एक खेळाडू पिढी या मैदानावर घडल्याचे दिसून येते.
विविध मैदानी खेळांबरोबरच गावातील जत्रा, लग्न, साखरपुडे, विविध राजकीय पक्षांच्या सभांसाठी प्रकल्पग्रस्तांची ही हक्काची मैदाने होती. ती सिडकोने विकासकांना विकल्याने घणसोली येथे विकासक आणि प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्यात संघर्ष उभा राहिला होता तर अजातशत्रू असलेल्या तळवली गावातील तरुणांनी परांपरागत मैदाने हातून गेल्याने एका जुन्या मैदानाचा श्रमदानाने विकास केला आणि ते मैदान वाचावे यासाठी संघर्ष उभा केला. त्याला अखेर कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील आणि युवा अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील यांच्या प्रयत्नाने यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय हे मैदान विकासकाच्या घशात घालण्यास सिडकोला मज्जाव केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ९५ गावांशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांना जिवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.