नवी मुंबई :  बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात आयोजित या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या २ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहराविषयीची स्वच्छतेची रूपरेषा आपल्या चित्रांतून रेखाटली आहे.

नवी मुंबई शहराचे भविष्य असणारी ही मुले आज आपल्या मनातल्या स्वच्छतेविषयीच्या संकल्पना चित्रांतून साकारत आहेत. हीच मुले उद्याच्या स्वच्छ, सुंदर नवी मुंबईचे शिल्पकार असतील असा विश्वास यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केला.

सहभागी सर्व मुलांनी व उपस्थितांनी निसर्गाच्या पंचतत्त्वाचे रक्षण करण्याची ‘माझी वसुंधरा अभियान’ सामूहिक शपथ ग्रहण केली. सकाळी ७ ते ७.१५ वाजल्यापासूनच मुले, शिक्षक, पालक अत्यंत उत्साहाने कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात उपस्थित होते. त्यामुळे या उद्यानाला चित्रनगरीचे स्वरूप आले. 

माझे शहर, माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त माझे शहर, स्वच्छतेचा बालमहोत्सव हे तीन विषय त्यांना देण्यात आले होते.