नवी मुंबई: सिडको महामंडळाच्या स्थापत्य विभागातील सहाय्यक अभियंता या संवर्गातील १०१ जागांसाठी ८ जूनला परीक्षा होणार असून तब्बल १८ हजार उमेदवार एकाच वेळी विविध केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे ही परीक्षा होऊ न शकल्याने परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. अखेर सिडकोच्या कार्मिक विभागाने संकेतस्थळावर या परीक्षेची तारीख जाहीर केली.
२०१८ सालापासून सिडको मंडळाने स्थापत्य विभागातील सहाय्यक अभियंता या पदासाठी १०१ उमेदवार भरती प्रक्रिया जाहीर केली. वेगवेगळ्या कारणावरुन ही भरती होऊ शकली नाही. अखेर सिडको मंडळाने मागील वर्षी १९ जानेवारी ते २०२ फेब्रुवारी या दरम्यान ऑनलाइन अर्जाने या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरू केली.
दोनशे गुणांची ही परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये १०० गुणांसाठी स्थापत्य अभियंता विषयावर तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत. ३० गुण चालू घडामोडींवर आधारित असतील. ३० गुणांची बुद्धीमत्ता चाचणी आणि प्रत्येकी २०-२० गुण हे मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रश्नांसाठी असतील.
सिडकोमध्ये प्रकल्पग्रस्त नोंदीत अभियंत्यांना कामांचे वाटप व्हावे असे धोरण सिडकोने अद्याप न अवलंबल्यामुळे तरुण अभियंत्यांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे भूमिपूत्र इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष हितेश ठाकूर यांनी सांगितले.