नवी मुंबई : दळणवळण, आर्थिक विकास आणि उत्तम रहाणीमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास या त्रिसुत्रीवर आधारित असलेला आणि नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीचे व्यापार, विकासाचे केंद्र बनवू पहाणारा सिडकोचा १६ हजार २५० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसह दळणवळण आणि गृहनिर्माण या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २,१३० कोटी रुपयांची वाढीव उलाढाल करत नवीन प्रकल्पांना गती देण्याचा स्पष्ट संदेश सिंघल यांनी या अर्थसंकल्पातून दिला आहे.
सिडकोच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सिंघल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार १६,१५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १०० कोटी रुपयांची शिल्लक राहणार आहे. मागील २०२५–२६ वर्षात सिडकोने ९,७७४.२३ कोटींची प्राप्ती आणि ९,७७०.२६ कोटींचा खर्च नोंदवत आर्थिक शिस्त दाखवली होती. २०२६ – २०२७ या आर्थिक वर्षात सिडकोच्या तिजोरीत सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सिडकोला घरविक्रीतून सिडकोला ६,७७७ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.
तसेच मेट्रोच्या तिकीट भाडे व इतर उत्पन्नातून २१ कोटी रुपये, पाणीपट्टी शुल्क सुमारे १०० कोटी रुपये जमा होण्याचा अंदाच व्यक्त केला आहे. नवीन शहर, रेल्वे प्रकल्प आणि नैना प्रकल्प यातून मिळणारे उत्पन्न हे ३६८ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. खर्चाच्या बाबी लक्षात घेता सिडकोचे सुरू असलेले प्रकल्पांसाठी आणि ठेवी व इतर सामान्य खर्चासाठी सिडकोने ८२९३ कोटी रूपये या खर्चात दर्शविले आहेत. तसेच सिडकोच्या महागृहनिर्माणासाठी ३,३३७ कोटी रूपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. पाणी पुरवठा व इतर जलप्रकल्पांसाठी १,७६९ कोटी रूपये सिडको खर्च कऱणार आहे. तसेच नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी १,२१८ कोटी रुपये खर्चाची तरतूद ठेवली आहे. सिडकोने नवीन वसाहत या लेखा शिर्षकाखाली ३७१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी २६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
पायाभूत सुविधा, दळणवळणाला प्राधान्य
यंदाच्या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. एरोसिटी, एज्युसिटी आणि मेडिसिटीसारख्या थीम आधारित प्रकल्पांसाठी मोठ्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो लाईन ८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), मेट्रो लाईन १ए व लाईन २, तसेच ठाणे–एनएमआयए एलिव्हेटेड कॉरिडॉर (६,५२१ कोटी) या प्रकल्पांमुळे दळणवळणात मोठी सुधारणा होणार आहे.
नवीन आर्थिक व औद्योगिक प्रकल्प
खारघर येथे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क (१५५ हेक्टर), जेएनपीए–एनएमआयए दरम्यान लॉजिस्टीक पार्क (५६० हेक्टर) आणि आफ्रिका–इंडिया इंटरनॅशनल डेव्हलपमेंट झोन (एआयआयडीझेड) यांसारखे प्रकल्प यंदा विशेष लक्षात आहेत. याशिवाय २० हजार प्रेक्षक क्षमतेचे इनडोअर एंटरटेनमेंट अरेना, युनिटी मॉल आणि गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पांनाही गती दिली जाणार आहे.
गृहनिर्माणात वाढीव भर
मागील वर्षी १६,८७६ घरांची योजना राबविल्यानंतर यंदा सुमारे १९,३०० घरांची नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा वाढणार आहे.
नैना प्रकल्पावर विशेष लक्ष
नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र) प्रकल्पासाठी सिडकोने मागील वर्षी ५२७ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यावर न्यायालयीन कचाट्यात या प्रकल्पाचे काम सापडल्याने यंदा या प्रकल्पाला अधिक गती देत पायाभूत सुविधा आणि रस्ते विकासासाठी वाढीव निधी सिडकोने नियोजित केला आहे.
जलपुरवठा प्रकल्पांना चालना
कोंढाणे धरण ३५० दशलक्षलीटर (एमएलडी), हेटवणे धरणातून २७० एमएलडी आणि बाळगंगा धरणातून ३५० एमएलडी या जल प्रकल्पांद्वारे भविष्यातील सिडको वसाहतींची पाण्याची गरज भागवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलवाहिन्या, बोगदे आणि शुद्धीकरण प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत काय नवीन?
– अर्थसंकल्पात लक्षणीय वाढ (१४ हजार कोटींवरून १६,२५० कोटी)
– विमानतळाभोवती थीम-आधारित शहर विकासाला गती
– मेट्रो आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीवर मोठा भर
– गृहनिर्माण योजनांमध्ये वाढ
– नैना प्रकल्पासाठी प्रत्यक्ष कामांना चालना
सन २०२६ – २०२७ साठीचा सिडकोचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाबाबतच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. धोरणात्मक विकास उपक्रमांच्या जोरावर नवी मुंबई एक प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे. – विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
