नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पश्चिम भागाकडील मार्गिका जोडणीसाठी (कनेक्टिव्हीटी) सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील संयुक्त प्रकल्प असणाऱ्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्गावरून विमानतळाकडे येणारी-जाणारी वाहतूक या प्रकल्पामुळे सुलभ होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा पुर्ण होण्याच्या मार्गावर असून विमानतळाला उत्तम मार्गिका जोडणी असावी, याकरिता त्या परिसरातील महत्त्वाच्या मार्गांना विमानतळासोबत जोडण्याकरिता जोडणीमार्गांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा बंदर (पोर्ट) कनेक्टिव्हिटी कार्यक्रम हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत आम्र मार्ग, राज्य महामार्ग-५४ आणि राष्ट्रीय महामार्ग-४ बी यांच्या विस्तारिकरणाकरिता ‘मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लिमिटेड’ या विशेष उद्देश वाहन कंपनीची स्थापन करण्यात आली आहे.
या कंपनीच्या माध्यमातून निधी संकलन आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जेएनपीटी आणि सिडको यांची अनुक्रमे ६७.०४%, २६.९१% आणि ६.०५% इतका हिस्सा आहे. सिडकोकडून या प्रकल्पासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची जमीन देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता या महामार्गाचे विस्तारीकरण ही महत्त्वपूर्ण मार्गिका जोडणी (कनेक्टिव्हीटी) असणार आहे.
पश्चिम प्रवेश आंतरबदल हा अर्ध क्लोव्हरलिफ रचना असलेला असून, उलवे किनारी मार्गावरील १.२ किलोमीटर उन्नत विमानतळ लिंक रस्त्याशी जोडण्यात आला आहे. या मार्गावर दोन लूप आणि दोन रॅम्प असणार आहेत. दक्षिणेकडे जाण्यासाठी लूप – ए आणि उत्तर दिशेसाठी रॅम्प ए, तर विमानतळावरून बाहेर जाण्यासाठी लूप बी आणि रॅम्प बी वापरले जातील. तसेच, एक अतिरिक्त वाहन निम्नमार्ग आणि उलवे नदीवरील छोटा पूलही उभारण्यात येणार आहे.
अटल सेतू ते विमानतळ यामधील जोडणीसाठी उलवे किनारी मार्ग
याशिवाय, विमानतळाच्या पूर्व बाजूसही एनएच-४बी (NH-4B), एनएच-५४८ (NH-548) सोबत जोडण्यासाठी पुर्ण क्लोव्हरलिफ प्रकारातील पूर्व प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अटल सेतू ते विमानतळ यामधील जोडणीसाठी उलवे किनारी मार्ग विकसित केला जात आहे. जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग पूर्णतः कार्यान्वित होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परिपूर्ण मार्गिका जोडणी लाभावी, याकरिता सिडकोतर्फे अनेक मार्गिका जोडणी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य प्रवेशमार्गांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास थेट जोडणी होणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल आणि पूर्व प्रवेश आंतरबदल हे त्यांपैकी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या मार्गिका जोडणी प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे होणारी वाहतूक सुरळीतरीत्या पार पडणे सुनिश्चित होणार आहे. – विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको