नवी मुंबई – गेल्या वर्षभरात दक्षता विभागामार्फत जनजागृती, मार्गदर्शन आणि प्रबोधनाचे विविध उपक्रम राबवूनही सिडकोमधील भ्रष्टाचाराशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आल्याने प्रशासनाने आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर सिडकोने ‘चेंजिंग माईंडस’ या उपक्रमाची नव्या स्वरूपात पुनश्च सुरुवात केली असून, कार्यक्षमता, नैतिकता, उत्तरदायित्व आणि लोकाभिमुख सेवा यांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या सभागृहात बुधवारी आयोजित कार्यशाळेत विभागप्रमुख आणि विभागीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यापूर्वी या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जात होते. मात्र यावेळी संस्थेतील अनुभवी वरिष्ठ अधिकारी, त्यांचे अनुभव आणि नेतृत्वगुण यांचा उपयोग करून कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची नवी संकल्पना राबविण्यात आली.
दक्षता विभागाकडून मागील वर्षभरात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती आणि नैतिकतेसंदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तरीही विविध विभागांतील काही प्रकरणे उजेडात आल्याने केवळ नियम, तपास आणि कारवाई यांवर भर देऊन अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्याची जाणीव प्रशासनाला झाली असावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणणे, सेवाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे आणि उत्तरदायित्वाची भावना वाढविणे यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यशाळेत सेवाभिमुख प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि परिणामकारक सेवा वितरण या विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सेवा हक्क कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जलद, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कामकाज अधिक कार्यक्षम करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा, कार्यपद्धतीतील अडथळे दूर करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार प्रशासन विकसित करणे या मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा आणि सेवाभिमुख कार्यसंस्कृती विकसित करण्याचा संदेश देण्यात आला.
“संस्थात्मक बदलासाठी सर्वप्रथम विचारसरणीत सकारात्मक परिवर्तन आवश्यक आहे. नागरिकांना पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” – शांतनू गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको “सेवा हक्काच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने कार्यक्षमतेची नवी मानके निर्माण करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी सकारात्मक बदल ही काळाची गरज आहे,” – गणेश देशमुख, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको
