नवी मुंबई : खारघर आणि रोडपाली परिसरातील सिडकोच्या भूखंडांवर विनापरवानगी उभारण्यात आलेल्या खेळाच्या टर्फ, नर्सरी शेड, अनधिकृत गॅरेज आणि वाहनतळावरील शेडवर सिडकोने कारवाई करत ही बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने पाडली. पावसाळ्यातही अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सुरूच ठेवण्याचे निर्देश सिडको प्रशासनाने दिले असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) नियंत्रक विभागाने ७ जुलै रोजी खारघर नोडमध्ये ही मोहीम राबवली. खारघर येथील सेक्टर ३५-जी मधील भूखंड क्रमांक १३ वरील सुमारे १,६०० चौरस मीटर क्षेत्रात विनापरवानगी उभारण्यात आलेले खेळाचे टर्फ आणि नर्सरी शेड जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.

त्यानंतर कळंबोली नोडमधील रोडपाली परिसरात ‘सामाजिक सेवा’ या प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या भूखंड क्रमांक १, सेक्टर १०-ई येथील सुमारे ४०० चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत गॅरेज तसेच जुन्या रिक्षांच्या पार्किंगसाठी उभारलेले शेडही हटविण्यात आले. हा भूखंड पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सिडकोने दिली.

संबंधित बांधकामे सिडकोची पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आल्याने नियमानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर व कळंबोली नोडचे नियंत्रक श्रीकांत पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामे नियंत्रक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सिडको पोलीस पथक, सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचा सहभाग होता.