नवी मुंबई – नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि अवैध राडारोडा टाकण्याच्या प्रकारांविरोधात सिडको महामंडळाने धडक कारवाई सुरूच ठेवली असून २५ व २६ मे रोजी विविध भागांत मोठी मोहीम राबविण्यात आली. बेलापूर, ऐरोली आणि खारघर येथे अनधिकृत बांधकामे व झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे सिडकोच्या दक्षता विभागाच्या भरारी पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध राडारोडा टाकणारे तीन डंपर पकडून चालकांविरोधात तीन पोलीस ठाण्यांत फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागाने २६ मे रोजी बेलापूर नोडमध्ये सेक्टर १९/२० मधील भूखंड क्रमांक एनए-११९, एनए-१२१, एनए-१३० आणि एनए-१३१ येथील सिडकोच्या अधिसूचित जागेवर सुरू असलेली आरसीसी प्लिंथ स्वरूपातील अनधिकृत बांधकामे हटविली. या कारवाईसाठी पोकलेन, जीप आणि कामगारांची मदत घेण्यात आली.ऐरोली नोडमध्येही त्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. सेक्टर १ मधील सर्व्हे क्रमांक २६८ ते २७१ या संपादित जागेवरील तळमजल्याच्या अनधिकृत बांधकामाचे नऊ स्लॅब ब्रेकरच्या सहाय्याने पाडण्यात आले. या मोहिमेत अतिक्रमण विभाग, पोलीस, महावितरण आणि सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता.खारघरमध्ये सेक्टर ८ आणि ११ मधील सुमारे ६ हजार चौरस मीटर क्षेत्रावरील ११५ झोपड्यांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्या.
तसेच सेक्टर ३६ मधील एका भूखंडावरील पत्र्याचे अनधिकृत कुंपण आणि १२ व्यावसायिक स्टॉलही हटविण्यात आले.२५ मे रोजी सिडकोच्या भरारी पथकाने पनवेल, खारघर आणि न्हावा परिसरात अवैधरीत्या राडारोडा (डेब्रीज) टाकणाऱ्या तीन डंपरवर कारवाई केली. संबंधित डंपर चालकांकडून सिडकोच्या जागांवर परवानगीशिवाय राडारोडा टाकला जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २७१ अन्वये पनवेल, खारघर आणि न्हावा-शेवा पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून डंपर जप्त करण्यात आले आहेत. सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी सूरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि सिडकोचे अनधिकृत बांधकामे विभागाचे मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कारवाया राबविण्यात आल्या आहेत. शहरातील सिडकोच्या जागांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या राडारोडा टाकण्याच्या प्रकारांविरोधात पुढील काळातही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
