नवी मुंबई – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिडको कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, विविध संवर्गांतील भरती, स्टेनोग्राफर पदासाठी पक्षी समितीच्या खंड दोनची अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांच्या दहावी-बारावी उत्तीर्ण पाल्यांचा गुणगौरव सोहळा आदी मागण्यांना सिडकोच्या व्यवस्थापनाकडून गती मिळाली आहे. त्याचबरोबर यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक कर्मचाऱ्यांसह संघटनेच्या प्रतिनिधींना भेटही देत नव्हते. यामुळे मागील दोन वर्षांपासून खंडित झालेले कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन पुन्हा आयोजित करण्यास नव्या व्यवस्थापकीय संचालकांनी (एम.डी) मंजुरी दिल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनच्या वतीने नूकत्याच (शुक्रवारी, ता.११)  झालेल्या बेलापूर येथील सिडको भवनाच्या व्दारसभेत याबाबत माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. 

सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुद्गल यांच्या काळात अनेक वर्षांनंतर एकाच वेळी १३ क्षेत्राधिकाऱ्यांना सहायक विकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय विविध संवर्गांतील पदोन्नती आणि कालबद्ध पदोन्नतीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विविध संवर्गांतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे.

स्टेनोग्राफर पदासाठी पक्षी समितीच्या खंड दोनची अंमलबजावणी करण्यात आली असून, त्याचा आर्थिक लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना आगामी वेतनात मिळणार आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेला कर्मचाऱ्यांच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण पाल्यांचा गुणगौरव सोहळाही आता कुटुंबीयांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे.

काही काळापासून खंडित झालेले कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन २४ ऑक्टोबर आयोजित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांच्या आयोजनालाही मान्यता मिळाली आहे. रखडलेल्या कर्मचारीविषयक उपक्रमांना पुन्हा सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच पावसाळ्यात भूमापक,शिपाई, माळी,स्वच्छता कर्मचारी,सुरक्षा रक्षक,वाहन चालक,भूमापक सहायक संवर्गाला गणवेश, बूट,छत्र्या देण्याबाबतची यावर्षीची मागणी व्यवस्थापनाने मंजूर केल्याचेही सांगण्यात आले. 

सिडको एम्प्लॉइज युनियनची द्वारसभा शुक्रवारी (ता. ११) दुपारी बेलापूर येथील सिडको भवनाच्या प्रवेशद्वारावर झाली. युनियनचे सरचिटणीस नितीन कांबळे यांनी पूर्ण झालेल्या तसेच मंजुरीच्या प्रक्रियेत असलेल्या मागण्यांची माहिती दिली. अध्यक्ष सुभाष पाटील यांनी युनियनच्या पाठपुराव्याची माहिती देत कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सभेला उपाध्यक्ष संजय पाटील, सुधीर कोळी, सहसचिव धर्मराज व्हटकर, सुबोध भोईर, वैभव काळे यांच्यासह पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सिडको कर्मचाऱ्यांनी अंशदायी उपदान (ग्रॅच्युइटी) लवकरच मिळावी. तसेच भविष्यात सिडको मंडळाच्या महत्वकांक्षी प्रकल्पात म्हणजे एज्युसीटी आणि मेडिसीटा यांमध्ये सिडको कर्मचाऱ्यांच्या मुलांना ५% आरक्षित जागा ठेवण्यात याव्यात. आणि कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक भत्ता,उपहार गृह भत्ता,प्रवास भत्ता यामध्ये वाढ करावी अशा मागण्यांसाठी युनियनचा पाठपुरावा सुरू असल्याचे सरचिटणीस कांबळे यांनी सांगीतले. 

मागील महिन्यात सिडकोच्या एमडींनी दिडशेहून अधिक कर्मचारी व अधिका-यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच विभागात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या काही निवडक अधिका-यांची बदली केली नव्हती. त्यामुळे बदली प्रक्रियेत सर्वसमावेशक सूत्र अवलंबण्याची मागणी युनियनने पत्र देऊन एमडींकडे केली होती.