नवी मुंबई – नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सिडको महामंडळाने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. सिडकोच्या १६,८७६ घरांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या लोकप्रिय गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी होता यावे, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) यांच्यासाठी एकूण १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या घरांची रचना सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन केल्याचा दावा सिडकोने केला आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात दर्जेदार निवासाची संधी नागरिकांना मिळेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येणाऱ्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग तसेच मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभत आहे. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन प्रवास सुलभ होण्यासोबतच आधुनिक आणि सक्षम शहरी जीवनशैलीचा लाभ मिळणार असल्याचा दावा सिडकोने केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अनामत रक्कम (ईएमडी) भरण्याची तसेच पसंतीचे पर्याय निवडण्याची अंतिम मुदत १९ मार्च ही आहे. इच्छुक नागरिकांनी अर्ज करण्यासाठी http://www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.
योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत व अद्ययावत माहिती सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकांद्वारे आणि अधिकृत समाजमाध्यमांवरून वेळोवेळी दिली जात असून नागरिकांनी अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले आहे. दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन अधिकाधिक नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि नवी मुंबईत आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडको महामंडळाकडून करण्यात आले आहे.
