वाशी ते बेलापूर या ११ किलोमीटर लांबीच्या पामबीच मार्गाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आलेला कोपरखैरणे ते ऐरोली या सहा किलोमीटर लांबीच्या पामबीच विस्तार मार्गासाठी सिडकोने ५० टक्के  आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पालिकेचे मावळते आयुक्त डॉ. रामास्वामी व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या भेटीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महामुंबई क्षेत्रातील वाहतूक कोंडीला अनेक पर्याय शोधले जात आहेत. यात ऐरोली ते शिळफाटा फ्री वे, तुर्भे ते खारघर उन्नत मार्ग आणि पर्यायी रस्ते उपलब्ध केले जात आहेत. शीव-पनवेल मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय ठरू शकलेले वाशी ते बेलापूर हा सिडकोने २० वर्षांपूर्वी पामबीच मार्ग उभारला. त्यामुळे अंतर्गत वाहतुकीला सोयीचे झाले.

या ११ किलोमीटर लांबीच्या पामबीच मार्गाचा विस्तार मार्ग म्हणून सिडकोने १२ वर्षांपूर्वी कोपरखैरणे ते ऐरोली या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र या मार्गाच्या उभारणीत सागरी नियंत्रण कायद्याबरोवरच खारफुटी संरक्षण कायदाची अडचण आली. दोन किलोमीटर अंतरावर घनसोली येथे खारफुटीचे जंगल पसरले असून ते नष्ट करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे सिडकोचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेली १२ वर्षे रखडला आहे. हा रस्ता न झाल्याने सिडकोच्या येथील भूसंपादनाला म्हणावा तसा भाव येत नाही. याच प्रकल्पाच्या जोरावर सिडकोने ऐरोलीच्या बाजूस ८० हेक्टर जमिनीवर एक ‘डिप्लोमॅटिक इंटरनॅशनल इन्कलेव्ह’ प्रकल्प हाती घेतला होता. जगातील सर्व दूतावास एकाच ठिकाणी आणण्याचा हा प्रयत्न होता. हा प्रकल्प राखडल्याने हे नियोजनही फिसकटले.

यावर उपाय म्हणून खारफुटी जंगलाच्या वरून एक तरंगता पूल बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. २५ महिन्यांपूर्वी सिडकोने घणसोली नोड पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. हा शहरातील शेवटचा नोड हस्तांतरित होता. त्यामुळे येथील सेवासुविधा देण्याची जबाबदारी आता पालिकेवर येऊन ठेपली आहे. या तरंगत्या पुलावर पालिकेचे ३७५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी पालिकेने या पुलाचा फायदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी मदत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सिडकोने सकारात्मक प्रतिसाद दिला असून अर्धा खर्च उचलण्याची जबाबदारी उचलली आहे. या भागात सिडकोचे अनेक भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा तरंगत्या पूल लवकर झाल्यास सिडकोच्या तिजोरीत या भूखंड विक्रीतून कोटय़वधी रुपये येणार असल्याने सिडको यासाठी आर्थिक सहकार्य करण्यास तयार झाली आहे.

पामबीच विस्तार मार्गासाठी पालिका सिडकोकडे आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील होती. यात सिडकोने अर्धी मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. हा रस्ता नवी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यास फायदेशीर ठरणार आहे.

– डॉ रामस्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका