नवी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) उपलब्ध आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) तसेच विना-ईडब्ल्यूएस सदनिकांच्या विक्रीची योजना सिडकोने पुन्हा सुरू केली आहे. ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ (एफसीएफएस) पद्धतीने खारघर, तळोजा, कळंबोली आणि द्रोणागिरी येथील ५०० ईडब्ल्यूएस आणि २,५०० विना-ईडब्ल्यूएस, अशा एकूण सुमारे तीन हजार सदनिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. इच्छुक अर्जदारांना उपलब्धतेनुसार आपल्या पसंतीची सदनिका थेट निवडून तिची नोंदणी करता येणार आहे.

‘एफसीएफएस’ या योजनेची सुरुवात डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात आली होती. तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील या योजनेतील सदनिकांच्या किंमती आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील दरांनुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. सदनिकेची सर्व देयके प्राप्त झाल्यानंतर तातडीने ताबा देण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

एफसीएफएस योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिकांची नोंदणी करणाऱ्या पात्र अर्जदारांना केंद्र सरकारच्या पीएमएवाय-एमआयएस संकेतस्थळावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी म्हणून नाव जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडणे आणि आवश्यकतेनुसार ओटीपीद्वारे पडताळणी करणे बंधनकारक आहे.

ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून लाभार्थी जोडणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थी जोडणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून लागू अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले आहे.

सदनिका कोठे आहेत?

तळोजा येथील सेक्टर २१, २२, २७, ३४, ३६ आणि ३७, खारघर सेक्टर ४०, द्रोणागिरी सेक्टर ११ व १२ तसेच कळंबोली सेक्टर १५ येथे सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांपैकी अद्याप उपलब्ध असलेल्या सदनिकांची नोंदणी एफसीएफएस पद्धतीने करण्यात येणार आहे.