राखीव किमतीतही भरमसाट वाढ; हस्तांतरण शुल्कवाढीनंतरचा दुसरा निर्णय
nmv02आर्थिक मंदीची सर्वाधिक झळ बसली असली तरी घरांच्या आणि व्यापारी संकुलाच्या किमतीत कोणताही कमी होण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. काही दिवसापूर्वी हस्तांतरण शुल्कात वाढ केल्यानंतर नवी मुंबईत घरांच्या बाबतीत आदर्श दर ठरविणाऱ्या सिडकोने वाशी, सानपाडा, नेरुळ, कोपरखैरणे येथील राखीव किमतीत वाढ केली आहे. भविष्यातील अद्ययावत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रोणागिरी नोडची राखीव किंमतही वाढवली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे दिवसेदिवस दुरापास्त होणार आहे. सिडकोच्या राखीव किमतीनंतर मूळ किमतीच्या आधारे भूखंड विकले जातात.
घर नोंदणीसाठी राज्य सरकार रेडी रेकनेरचे दर निश्चित करीत असून नवी मुंबईत सिडको आपले भूखंड भाडेपट्टयावर देताना अशा प्रकारे दरवर्षी दर राखीव किंमत जाहीर करीत आहे. ही राखीव किमंत ऑगस्ट पासून लागू होणार असून या किमंतीवर मूळ किमंत निश्चित करुन भूखंड विक्रीला काढले जातात. सिडकोच्या या राखीव किमंतीत यंदा वाढ झाल्याने स्पर्धेत भूखंड विकत घेणारे विकासक घरे किंवा व्यापारी गाळे चढय़ा दराने विकत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सानपाडा, पामबीच, वाशी, नेरुळ, या भागातील भूखंडांच्या किमंती एक लाख रुपये प्रती चौरस मीटर पेक्षा जास्त किमंतीत विकल्या जात असल्याचा अनुभव आहे. भूखंड जादा किमंतीत विकत घेतल्यास त्याचा खर्च घर विकत घेणाऱ्या ग्राहकाच्या खिश्यातून वसुल केला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच वाशी, सानपाडा, नेरुळ, आणि अलीकडे कोपरखैरणे या भागातील घरांच्या किमंतीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.
ऐरोली, घणसोली, सीबीडी, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, जूई कामोठे, उलवा या नोड मधील राखीव किमंती ह्य़ा गतवर्षी प्रमाणे सरासरी असल्या तरी अविकसित असणारे पण भविष्यात सर्व नोडना मागे सारणारे द्रोणागिरी नोडच्या राखीव किमंतीत सिडकोने तब्बल दीड हजाराची वाढ केली आहे.
विकास महाडिक