नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रात खासगी विकासकांपेक्षा सिडकोने बांधलेली घरे स्वस्त किमंतीत मिळतील या अपेक्षेने अर्ज करणाऱ्या ग्राहकांची निराशा होऊ लागली आहे. सिडकोने गुढी पाडव्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या विक्री महायोजनेतील घरे ही आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडको या घरांच्या किमतींचा पुनर्विचार करणार असल्याचे समजते.
सिडकोने खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या नोड मध्ये काही जुनी व नवीन घरे, गाळे, भूखंड यांची विक्री दोन एप्रिल रोजी जाहीर केली आहे. ही घरे ई लिलाव किंवा निविदा पद्धतीने विकली जाणार आहेत. त्यामुळे या घरांसाठी सिडकोने राखीव ठेवलेल्या किमती भरमसाठ असून त्या आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग आहेत. सिडको अथवा म्हाडाची घरे स्वस्त किमतीत मिळत असल्याने ग्राहक त्यांना पसंती देत असल्याचे दिसून येते.
सिडकोने मागील दोन वर्षांत अल्प व आर्थिक दृष्टय़ा दुर्बल उत्पन्न घटकांसाठी सोडत काढलेल्या आहेत. मात्र, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी सोडत काढण्यात आली नव्हती. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोने शिल्लक जुन्या व नवीन घरांची सोडत काढण्यात आली आहे. यात २७८ घरे व २७५ भूखंडांचा समावेश आहे. नेरुळ येथील सी वूड या अनिवासी संकुलात शिल्लक असलेल्या चार घरांची किंमत थेट तीन ते चार कोटीच्या घरात आहे. या संकुलातील इमारत क्रमांक ५४ मधील १२३० चौरस फुटाचे एका घराची किंमत ३ कोटी ३१ लाख ६९ हजार नमूद करण्यात आलेली आहे मात्र या क्षेत्रात हेच घर तीन कोटी रुपयांच्या कमी किमतीत मिळू शकेल असा रियल इस्टेट मधील जाणकरांचे मत आहे. हाच प्रकार व्हॅली शिल्प (खारघर) मधील घरांबाबत आहे. या इमारतीतील एक घर सिडकोने १ कोटी १३ लाख ७४ हजार रुपये किमतीला विकण्यास काढले आहे. या भागात एक कोटीच्या वर किमतीत घर विकले जात नाही असे येथील घर विक्री करणारे दलाल सांगत आहेत.
खारघरमधील सिडकोच्या सर्वच मोठय़ा घरांच्या किमती या एक कोटीपेक्षा जास्त आहेत. सिडकोच्या घरांच्या किमती या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केल्या जात असून अर्थशाश्त्र विभागाकडून त्या सादर केल्या जात असतात. त्यामुळे या घरांच्या किमती कमी जास्त करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा आहे. या किमती जास्त असल्याचा कबुली सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सिडकोने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केलेली घर विक्री योजना ही मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांची चेष्टा करणारी आहे. पाच नोडमधील सिडकोच्या या घरांच्या किमती अवाच्या सव्वा असून खासगी विकासकांपेक्षा जास्त किमतीच्या आहेत. सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी शासन अशा योजना जाहीर करीत आहे पण सिडको नफा कमविण्याचा फंदात असून नागरिक या विक्री योजनेवर नाराज आहेत. -विजय साळे, मालमत्ता सल्लागार, सानपाडा