पनवेल : नवी मुंबई येथील वाशी रेल्वेस्थानकाजवळील सेक्टर ३० ए येथे सुमारे ८ हजार चौरस मीटरच्या भव्य भूखंडावर सिडकोने महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून लोकसभा आणि पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यावर १२१ कोटी रुपयांची निविदा यासाठी सिडको मंडळाने जाहीर केली आहे. मागील १० वर्षांपासून वाशी स्थानक परिसरात विविध राज्यांची भवन उभारण्यात आली. याठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भवनासाठी होणाऱ्या खर्चातील ९० लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर माफ केला होता. आ. मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्षांपासून याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. वाशी परिसरात ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, राजस्थान, राज्यांच्या भवन इमारती दिमाखात उभ्या आहेत. परंतू महाराष्ट्र भवनाची इमारत येथे नसल्याने सरकारी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुद्धा येथे महाराष्ट्र भवन असावे अशी मागणी केली जात होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सूरु झाल्यानंतर अशा भव्य वास्तूची आवश्यकता सर्वाधिक परदेशाहून येणाऱ्या शिष्टमंडळाला भासणार आहे. हेही वाचा..नवी मुंबई : अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार वाहनांवर कारवाई, पन्नास लाख रुपयांहून अधिक रकमेची दंडवसुली २०२२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. म्हात्रे यांनी सरकारचे लक्ष वेधल्यावर तत्कालीन सरकारने १०० कोटींचा निधी या भवनासाठी मंजूर केल्याची घोषणा केली होती. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र भवन इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र भवनाची इमारत ही १२ मजल्यांची असेल. इमारतीच्या आराखड्यात राज्याचा सांस्कृतिक वारशाचे दर्शन भवनात प्रवेश केल्यावर सामान्यांना होईल यासाठी भवनामध्ये विविध थोर पुरुषांचे पुतळे लावण्याऐवजी त्यांचे भव्य छायाचित्र लावण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दरबारामध्ये बसलेले छायाचित्र, जिजाऊमाता, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा थोर महात्मांचे छायाचित्र लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे खाद्य पदार्थ या भवनात मिळू शकतील. तसेच मोठ्या व लहान १६१ खोल्या भवनात असणार आहेत. भव्य सभागृहासोबत लहान सभागृह, इ वाचनालय, वाहनतळाची तरतूद भवनात केली आहे.