पाच हजार शिल्लक घरांची प्रजासत्ताकदिनी सोडत

शिल्लक घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.

नवी मुंबई :  करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या पाच हजार घरांची सोडत २६ जानेवारी काढण्याची शक्यता आहे. सिडकोच्या पणन विभागाने ही सोडत जाहीर करण्याची सर्व तयारी केली असून याचा निर्णय सर्वस्वी सिडकोचे व्यववस्थापकीय संचालक घेणार आहेत.

सोडतीची मुदत जाहीर झाल्यानंतर एक महिना या सोडतीतील घरांसाठी अर्ज भरण्याची मुदत राहणार आहे. सिडकोने पाचनोडमध्ये २४ हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. या घरांची सोडत २ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. टप्याटप्याने सहा सोडती जाहीर करण्यात आल्या असून यातील सात हजार घरे अपात्र ठरली आहेत. प्रतीक्षा यादीवरील पात्र लाभार्थीनादेखील घरांचे वाटप केले जात आहे. सात हजार घरे अपात्र ठरत असतानाच तेवढय़ाच घरांचा ताबा देण्यात आला आहे. शिल्लक घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.

गृहनिर्मितीत सिडकोचे कोटय़वधी रुपये गुंतले असून त्या तुलनेत गुंतवणूक करण्यात आलेले पैसे वसूल होत नाहीत. त्यामुळे अपात्र अथवा विक्री न झालेली सर्व घरे नव्याने विक्री करण्याचे आदेश पणन विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोने पाच हजार नवीन घरांची सोडत काढणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जाहीर केले आहे. नवीन वर्षांत ही सोडत १४ जानेवारी किंवा २६ जानेवारी रोजी काढली जाणार होती. त्यासाठी पणन विभागाने सर्व तयारी केली होती. मात्र करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्याने सरकारने अनेक कडक निर्बंध लागू केले होते. यात दिवसभर जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. त्याबरोबर शासकीय कार्यालयातील उपस्थितीलादेखील मर्यादा घालण्यात आली आहे. राज्यातील विशेषत: मुंबई आणि नवी मुंबईतील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने सरकार निर्बंध शिथिल करीत आहे. त्यामुळे सिडकोने ही लांबणीवर टाकण्यात आलेली सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पणन विभागाने पुन्हा तयारी पूर्ण केली असून अर्ज स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा नगरविकासमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन अर्ज विक्री जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाच दिवसांवर आलेल्या प्रजासत्ताकदिनी किंवा या महिनाअखेर ही सोडत जाहीर केली जाणार आहे.

तळोजात अधिक घरे

२०१८च्या सोडतीत सिडकोने नवी मुंबई, पनवेल व उरणमध्ये तळोजा, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी व घणसोली येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. मात्र यातील तळोजातील घरांना मागणी कमी असल्याने तेथील घरे जास्त शिल्लक आहेत. त्या घरांचे नवीन सोडतीत समावेश असणार आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cidco lottery for 5000 home on 26 january zws

Next Story
बारा हजार बाधितांपैकी केवळ १,३९५ जण रुग्णालयात ; घरच्या घरीच उपचाराला प्राधान्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी