नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर–माझी पहिली पसंत’ या गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या ४ हजार ७७९ सदनिकांची संगणकीय सोडत शुक्रवारी बेलापूर येथील सिडको भवनात काढण्यात आली. या सोडतीत ३ हजार १४२ अर्जदार विजेते ठरले असून, स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आलेल्या योजनेला अर्जदारांचा प्रतिसाद मिळाला.

या योजनेतील ४ हजार ७७९ घरांसाठी ४ हजार १८० अर्जदारांनी नोंदणी केली होती. सिडकोतर्फे १५ ऑगस्टला या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. यामध्ये तळोजा सेक्टर-३९ येथे ४ हजार २२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव होत्या.

सोडतीच्या वेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, एनआयसीचे संचालक लक्ष्मीकांत गरजे, संचालक नरेंद्र भामरे, पणन व्यवस्थापक श्रीनिवास मोकळीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संगणकीय सोडत पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे. यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेमुळे विजेत्या अर्जदारांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे

“सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझी पहिली पसंती’ या गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना नवी मुंबईसारख्या नियोजित व जागतिक दर्जाच्या शहरात परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर उपलब्ध करून देणे, हा सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांचे गृहस्वप्न साकार होत असून, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशक गृहनिर्माणाच्या दिशेने सिडकोची वाटचाल सुरू आहे.” – अश्विन मुदगल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको