घरांची सोडत दिवाळीनंतरच

गेल्या वर्षी पंधरा हजार घरांच्या सोडतीत घर न मिळालेल्या हजारो ग्राहकांपैकी तीस हजार ग्राहकांच्या प्रतीक्षा यादीतील पाच हजार ग्राहकांना नवीन नऊ हजार महागृहनिर्मितीच्या सोडतीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना परिवहन आधारित गृहसंकुलातील घरांची लॉटरी लागणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे नवीन महागृहनिर्मितीतील घरांची सोडत आता दिवाळीनंतरच होणार असल्याचे समजते.

सिडकोने ९२४९ घरांची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. याच घरांबरोबर जुन्या स्वप्नपूर्तीतील तयार घरांची सोडत देखील काढणार आहे. या दोन्ही सोडतीसाठी एकूण ५४ हजार अर्ज आले आहेत. यात नवीन नऊ हजार घरांसाठी सोळा हजार ग्राहकांनी अनामत रक्कम भरून आरक्षण केले आहे तर स्वप्नपूर्तीतील ८१३ तयार घरांसाठी अडीच हजार अर्ज दाखल झालेले आहेत. या दोन्ही संकुलांतील घरांची पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी सोडत काढली जाणार होती. सुमारे दहा हजार ग्राहकांना घरांची भेट देऊन सिडको त्यांची दिवाळी साजरी करणार होती, मात्र आचारसंहिता व निवडणुका संपल्यानंतर लागलीच दिवाळी सुरू होत असल्याने ही सोडत आता दिवाळीनंतर होणार आहे. या दहा हजार घरांसाठी एकूण दोन लाख अर्ज येण्याची शक्यता आहे.

सिडकोकडे आतापर्यंत घरांची मागणी करणाऱ्या तीन लाख ग्राहकांची माहिती आहे. यात गेल्या वर्षी गांधी जयंतीला सोडत काढण्यात आलेल्या १४ हजार ७३८ घरांच्या ग्राहकांची एक यादी त्यांच्या संर्वगानुसार काढण्यात आली होती. सर्वसाधारणपणे घरांच्या संख्येएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाते. यातील पाच हजार ग्राहकांना नवीन ९ हजार २४९ ग्राहकांच्या महागृहनिर्मितीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे या घरांसाठी येणाऱ्या जवळपास दोन लाख मागणी अर्जात पाच हजार अर्ज हे जुन्या पंधरा हजार घरातील प्रतीक्षा यादीतील ग्राहक राहणार आहेत. या ग्राहकांना त्यांची अनामत रक्कम सिडकोने परत केलेली आहे. विद्यामान घरांसाठी असलेली अनामत रक्कम अदा करून या ग्राहकांना नवीन घरांच्या सोडतीत भाग घेता येणार आहे.

सर्वसाधारणपणे पितृ पंधरावडय़ात देशात शुभ कार्ये केली जात नाहीत. यात घरांसाठी अर्ज करणे अथवा अनामत रक्कम भरणे या कार्याचाही समावेश आहे. मात्र सिडकोच्या या महागृहनिर्मितीसाठी हा पितृ पंधरवडा अपवाद ठरला असून या पंधरा दिवसांत दहा हजार घरांसाठी पस्तीस हजार नोंदणी अर्ज झाले असून अर्धा ग्राहकांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. त्यामुळे ऑनलाइन विक्रीसाठी पितृ पंधरवडा अपवाद ठरत असल्याचे दिसून येते.

(या घरांची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला इरादा पत्र सिडकोकडून दिले जात नाही. काही वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था अशा इरादा पत्राची मागणी करण्याची शक्यता आहे.

या बँकांनाही हे इरादा पत्र ऑनलाइनच घेणे शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांची अडवणूक न करता वित्त संस्थांनी ग्राहकाकडून सर्व माहिती ऑनलाइन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन मॉर्गेज’

सिडको अथवा खासगी विकासकांच्या घरांना कर्जपुरवठा करताना त्या वित्त संस्था ती मालमत्ता तारण म्हणून गहाण ठेवत असते. ही प्रक्रिया पूर्वी त्या त्या वित्त संस्थेचे कर्मचारी सिडकोत जाऊन पूर्ण करीत असत. मात्र आता ऑनलाइन प्रकियेत ही मॉर्गेज प्रक्रियादेखील ऑनलाइन होणार आहे.