नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बेलापूर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश महाराव यांनी ‘देशाचे संविधान व आजची परिस्थिती’ या विषयावर प्रभावी भाष्य करत सामाजिक मूल्यांचे भान जपण्याचे आवाहन केले, तर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आंबेडकरांच्या विचारांपैकी एक जरी आत्मसात केला तरी जीवन यशस्वी ठरू शकते, असे मार्गदर्शन करत कर्मचाऱ्यांना प्रेरित केले.
सिडको बी.सी. एम्प्लॉइज असोसिएशन व सिडको एम्प्लॉइज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १५) दुपारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजय सिंघल उपस्थित होते. त्यांच्यासोबत सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, तसेच पोलीस उपमहानिरीक्षक व सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील समानतेचे तत्त्व आणि डॉ. आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या समानतेच्या तरतुदी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आजच्या स्त्रीने प्रगतीचे शिखर गाठले, असे ते म्हणाले. तसेच ‘संस्कृती’ आणि ‘विकृती’ यांची कथा सांगत सध्या हरवत चाललेल्या संस्कृतीला पुन्हा समाजानेच उचलून धरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजय सिंघल यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या विचारांची जीवनात अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जिद्द, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात केल्यास समाधानकारक कार्य करता येते, असे ते म्हणाले. सिडको एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर कोळी यांनी केले, तर सहसचिव सुवर्णा अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले. सिडको आर्टिस्ट कंबाईनचे अध्यक्ष सुधीर कोळी व त्यांच्या टीमने भीमगीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरचिटणीस योगेश ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपाध्यक्ष माधुरी माणिककुंवर, चिटणीस धर्मराज व्हटकर, खजिनदार विक्रम गायकवाड, सहचिटणीस आलोक मधाळे, सुवर्णा अहिरे, अजित तूपसुमंदर, तसेच माधवी शिंदे, कल्पना बोडके, पूजा खैरालिया, प्रीती भैसारे, संदीप साठे, राहुल गौरखेडे, अतुल कुबल आदींसह सिडकोचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
