महत्त्वाचे प्रमुख प्रकल्प वगळत ८० प्रकल्प गुंडाळले जाण्याची शक्यता

नवी मुंबईच्या दक्षिण भागासाठी वर्षभरापूर्वी सिडकोने तयार केलेला ३७ हजार कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पातील विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी विस्तार, नैना आणि किफायतशीर घरे हे मोठे प्रकल्पच राबविले जाणार असून ६० गावांचे घनकचरा व्यवस्थापन, खांदेश्वर प्लाझा विकास, नवीन सांडपाणी केंद्र, ७३ उद्याने, ३३ मैदाने, संपूर्ण एलईडी, स्मार्ट व्हिलेज योजना, पोर्ट आणि विमान प्रशिक्षण केंद्र यासारखे छोटे-मोठे ८० प्रकल्प तूर्त बाजूला ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने देशात ९८ शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २४ विविध प्रकारचे निकष लावण्यात आले असून यासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा क्रमांक लागला असून स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला राज्यात पहिला मान मिळाला आहे. शहर निर्माण करणाऱ्या सिडकोला मात्र या स्पर्धेत सहभागी करून घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला. त्यामुळे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्र वगळता सिडकोच्या अखत्यारीतील खारघर, पनवेल, कळंबोली, कामोठे, उलवा, द्रोणागिरी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने विकसित होणाऱ्या पुष्पकनगर या सात नोडची एक स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यमान प्रकल्पात अडीच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त समावेश करून दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशी येथे करण्यात आली.

या स्मार्ट सिटी प्रकल्पात विमानतळ (सोळा हजार कोटी), मेट्रो (अकरा हजार कोटी), नैना (सात हजार कोटी) आणि किफायतशीर ५५ हजार घरे (दहा हजार कोटी) यासाठीच्या खर्चाचा समावेश आहे. हा प्रकल्प ५३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा दिसू लागला. त्यामुळे सिडको पन्नास हजार कोटी रुपये खर्चाची स्मार्ट सिटी उभी करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यासाठी केंद्र सरकारच्या २४ निकषांबरोबरच सिडकोने आणखी सात निकष लावण्याचा निर्णय घेतला होता. यातील विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी विस्तार, नैना, किफायतशीर घरे यासारखे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, मात्र या बडय़ा प्रकल्पांबरोबरच स्मार्ट सिटीतील अन्य छोटे-मोठे ८० प्रकल्प सध्या बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहेत.

दुर्लक्ष झालेले प्रकल्प

स्मार्ट सिटी व्हिलेज, विरंगुळा केंद्र, पोर्ट आणि विमान परिचलनासाठी लागणारे प्रशिक्षण केंद्र, सागरी रस्ते, पामबीच मार्ग विस्तार, कोंडाणे धरण, हेटवणे धरण क्षमता वाढ, हेलिपॅड, बेलापूर सी वूड रेल्वे, ठाणे तुर्भे रेल्वे रुंदीकरण, बससेवा प्रोत्साहन, ६० गावांचे घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट ऑर्गनायझेशन, संपूर्ण एलईडी, नेचर पार्क, ध्वनिप्रदूषण नियंत्रण, नवीन सांडपाणी केंद्र, १०० पेक्षा जास्त उद्याने व मैदानांचा विकास, खांदेश्वर प्लाझा, वॉटर फ्रंट यासारख्या प्रकल्पांची सुरुवात झालेली नाही. या कामांची सिडकोत सध्या साधी चर्चा देखील केली जात नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असलेल्या या प्रकल्पांचा मागमूसही नसल्याने स्मार्ट सिटी ही संकल्पनाच गुंडाळण्यात आली असल्याचे चित्र आहे.