पनवेल : तळोजा फेज-२ मधील सेक्टर २८ येथील रायगड इस्टेट फेज-१ या सिडकोनिर्मित २५ मजली इमारतीमधील गृहसंकुलातील रहिवाशांना दिवसातून अवघ्या २० मिनिटांसाठी पाणी मिळत असल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी आणि जलमापक यंत्रातील संभाव्य तांत्रिक बिघाड यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) रहिवाशांनी बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या बैठकीत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह विविध तांत्रिक उपाययोजनांचे लेखी आश्वासन दिले.

सिडको मंडळाकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सोमवारपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. काही नोडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा, तर आठवड्यातील एक दिवस पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या नियोजनापूर्वीच रायगड इस्टेट या इमारतीमधील रहिवासी मागील अनेक दिवसांपासून पाणी समस्येने बेजार झाले आहेत. दिवसातून केवळ २० मिनिटे सदनिकेच्या नळातून पाणी मिळत असल्याने जगावे कसा असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी पाणी साठवताना रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

३० ऑक्टोबर रोजी काढलेल्या मोर्चात विजय थोरात, चंद्रशेखर साळवी, रोहन राऊत, अजय पवळ, दत्तात्रय गोळे, कुंडलिक कदम, नितीन खरात, सुनील धुरी यांच्यासह दोनशेहून अधिक रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. रायगड इस्टेट इमारतीपासून ते पेणधर मेट्रो स्थानकापर्यंत या रहिवाशांनी ‘पाणी आमच्या हक्काच, कोण म्हणत देणार नाही’ अशा घोषणा देत पायी सिडकोविरोधात मोर्चा काढला. त्यानंतर हे आंदोलक बेलापूर येथील सिडको भवन येथे पोहचले. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलकांना अर्बनहार्टमध्ये उभे राहण्याची सवलत दिली. त्यानंतर रहिवाशांच्या १० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांची माहिती दिली.

या बैठकीत जलमापक यंत्रातील हवेच्या दाबामुळे होणाऱ्या संभाव्य बिघाडाची तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले. टँकरद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच सोसायटीच्या गरजेनुसार जलवाहिन्यांद्वारे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे मान्य करण्यात आले. इमारतीतील २० ते २५व्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक दाबाबाबतही तांत्रिक तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे.

लेखी आश्वासनानंतरही पाणीपुरवठ्यात अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची तक्रार रहिवाशांचे प्रतिनिधी विजय थोरात यांनी केली आहे. त्यामुळे सिडकोने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.