नेरुळ, कोपरखैरणे नोडमधील ९ भूखंडांचा समावेश
नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी सिडकोने छोटे-मोठे मोकळे भूखंड विक्रीचा तिसरा योजना जाहीर केला आहे. करोनाकाळात बांधकाम व्यवसायाला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न म्हणून सिडकोने तीन टप्प्यांत २०३ भूखंडांची विक्री जाहीर केली आहे.
या विक्रीमुळे सिडकोच्या तिजोरीत तर भर पडणार आहेच पण महामुंबईच्या अर्थचक्राला गती मिळणार असल्याचा विश्वास सिडकोने जाहीर केला आहे. या भूखंडात ४१ चौरस मीटरच्या छोटय़ा भूखंडांपासून ते आठ हजार चौरस मीटरचे भूखंडाचा समावेश आहे.
मंगळवारी सिडकोने तिसरी भूखंड विक्री योजना जाहीर केली. पहिल्या योजनेत खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या दक्षिण नवी मुंबई भागातील १२ भूखंड आहेत तर दुसऱ्या योजनेत ऐरोली, घणसोली, खारघर, पनवेल, कळंबोली या नोडमधील निवासी वापराच्या १८२ भूखंडांचा समावेश आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यात नेरुळ व कोपरखैरणे या नोडमधील ९ भूखंडांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन प्रकारांतील भूखंडांमुळे निवासी, वाणिज्यिक या घटकांबरोबरच बांधकाम व्यावसायिक इमारती उभारून नागरिकांना चांगली घरे उपलब्ध करू शकणार आहेत. ४१ चौरस मीटर क्षेत्रफळापासून आठ हजार चौरस मीटर भूखंडांच्या या वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या भूखंडामुळे सर्व नागरिकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. छोटय़ा आकाराच्या भूखंडावर नागरिक बंगला, व्हिला उभारू शकणार आहेत. तर मोठय़ा भूखंडावर विकासक आपला गृह प्रकल्प उभारणार आहे.
सिडकोचे सर्व भूखंड हे निर्वेध मालकीचे असल्याने त्याला मागणी जास्त आहे. या भूखंडाच्या निविदा या ई निविदा, ई लिलाव पद्धतीने प्रसिद्ध केल्या जाणार असून इच्छुक नागरिक व विकासक यांनी त्यांची नोंदणी, अर्ज सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करण्याची प्रक्रिया ही सिडकोच्या संकेतस्थळावर होणार आहे.
