सिडको कामगार संघटनेची लवकरच निवडणूक

सिडकोच्या कामगार संघटनेचा राज्यातील कर्मचारी संघटनेत मोठा बोलबाला आहे.

नवी मुंबई : राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको महामंडळातील कामगार संघटनेची लवकरच सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिनाअखेर विद्यमान अध्यक्ष निलेश तांडेल हे निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची हंगामी निवड याच महिन्यात होणाऱ्या वािर्षक सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मागणीनुसार कोविड नियमांची अंमलबजावणी करीत या संघटनेची पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तांडेल यांनी गेली १६ वर्षे या पदावर कायम राहिलेले आहेत.

सिडकोच्या कामगार संघटनेचा राज्यातील कर्मचारी संघटनेत मोठा बोलबाला आहे. अनेक माजी अध्यक्षांनी या संघटनेच्या माध्यमातून सिडकोच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला आहे. व्हिडीओकॉन समूहीला एलईडीसाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या ३०० एकर जमिनीच्या विरोधात या कामगार संघटनेने अनेक वेळा प्रवेशसभा घेऊन रणशिंग फुकले होते. त्यामुळे राज्य सरकारला नंतर ही जमीन या समूहाकडून ताब्यात घ्यावी लागली.

१५५४ कामगार असलेल्या सिडको कामगार संघटनेची गेली अनेक वर्षे सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही. तांडेल यांच्या नेतृत्वाखाली बी. सी. कामगार संघटना एकत्रित कामगारांचे प्रश्न सोडवत असल्याने या संघटनेलादेखील मुख्य संघटनेच्या प्रवाहात स्थान आहे. सध्या कोविड काळ सुरू असल्याने निवडणूक न घेता विद्यमान अध्यक्षांच्या जागी हंगामी अध्यक्ष नेमल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी या महिन्यात एक ऑनलाइन सभा होणार असून त्यात या निवडणूक आणि हंगामी अध्यक्षाबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. या कामगार संघटनेच्या अध्यक्ष निवड व निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. निवडणूक दोन पॅनल आमनेसामने येत असल्याने ही निवडणूकही चुरशीची होणार आहे. सर्वसाधारण सभेत विरोधक पॅनल निवडणुकीची मागणी करण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cidco trade union elections soon ssh