नवी मुंबई : सिडकोच्या विविध नोडमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नागरिकांना आता आठवड्यातील ठरावीक दिवशी २४ तासांच्या पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे, कळुंद्रे आणि कामोठे या परिसरांसाठी सिडकोने नोडनिहाय पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. काही भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून, उलवे आणि द्रोणागिरीतील काही परिसरांत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करून वापर करावे लागणार आहे. अशा पद्धतीने पाणी कपात करण्याची सिडको मंडळाची ही पहिलीच वेळ आहे. सिडकोने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी कपातीच्या वेळापत्रकानुसार सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी घरातील अंतर्गत स्वच्छता कशी करावी असा प्रश्न गृहिणींना भेडसावत आहे.
शहर उभारण्याचा सपाट्यात शहरातील रहिवाशांना लागणा-या धरण बांधण्याचे नियोजन फिस्कटल्यावर जी स्थिती निर्माण होते तशा स्थितीला सध्या सिडको नोडमधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाई असल्याने सूमारे ४० टॅंकरमधून दिवसाला ३०० फे-या मारून रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागत आहे. यामध्ये एल निनोचे सावट असल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरण्यासाठी सिडकोने पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले.
या वेळापत्रकानुसार, दर आठवड्याच्या सोमवारी खारघर आणि नवीन पनवेल पूर्व तसेच मंगळवारी उलवेतील सेक्टर २, ३, ५, ६, ९, ११, २०, २१, २३, २४, २५ आणि २८ तसेच गव्हाण, कोपर व मोरावे आणि बुधवारी कळंबोली तसेच गुरुवारी करंजाडे, तर शुक्रवारी तळोजा, काळुंद्रे आणि कामोठे येथे २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी नवीन पनवेल पश्चिम येथेही पाणी कपात असेल असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.
उलवेतील सेक्टर ४, ८, १०बी, १५, १६, १७, १८, शेलघर, बामणडोंगरी, दापोली, शिवाजीनगर, न्हावा आणि खाडी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. द्रोणागिरीतील सेक्टर १, २, ११, १२, १४, १५, ३०, ४०, ४७, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, धुतुम, भेंडखळ, कामोठे, नवघर, नवघर पाडा, बोकडवीरा आणि कुंडे परिसरातही एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. वेळापत्रकातील सूचनेनुसार पाणी कपात २४ तास लागू राहणार आहे.
सिडको क्षेत्रातील पाणीटंचाईची समस्या यापूर्वीही समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, सिडको क्षेत्राची एकूण पाण्याची मागणी ३७६ दशलक्ष लिटर प्रतिदिन असताना प्रत्यक्ष पुरवठा ३५१ दशलक्ष लिटर होता. त्यामुळे २५ दशलक्ष लिटरची तूट सध्याच होती. खारघर आणि कामोठे परिसराला मोरबे धरणातून मिळणारा ५० दशलक्ष लिटर पाणीसाठाही अपुरा पडत असल्याने सिडकोने अतिरिक्त १५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली होती.
