नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाल्याने खारघर आणि तळोजा या उपनगरांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिडकोने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर केले आहे. टँकरची मागणी, सोसायट्यांपर्यंत पोहोचणारे टँकर आणि त्यांच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिडकोने डॅशबोर्ड प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे सहाय्यक अभियंत्यांपासून सहव्यवस्थापकीय संचालकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याची स्थिती आणि तक्रारींचा आढावा घेता येत आहे. सध्या खारघर आणि तळोजासाठी १४ टँकर कार्यरत असून, त्यांच्यामार्फत दररोज सुमारे १४० फेऱ्या केल्या जात आहेत.
सिडको मंडळाकडे स्वतःचा पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने खारघर, तळोजा आणि कामोठे या नोडसाठी नवी मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली होती. मागील वर्षापर्यंत या तीन नोडसाठी दररोज ५७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळत होते. त्यामुळे या पाण्यातील खारघर, तळोजासाठी २० एमएलडी आणि कामोठे येथे ३७ एमएलडी पाणी पुरवठा केला जात होता. नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कपातीनंतर कामोठे उपनगराला ३२ एमएलडी आणि खारघरला २० पैकी अवघे ८ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. मुळात खारघर व तळोजा या दोन्ही उपनगरांना मिळून १०४ एमएलडीची गरज आहे. यातील खारघर व तळोजासाठी हेटवणे धऱणातून ६२ आणि एमआयडीसीचे तळोजासाठी ५ एमएलडी पाणी अतिरिक्त घेतले जाते. एल निनोच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने सिडकोला दिलेल्या उसने पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आली. सध्या महापालिकेकडून दररोज ४० एमएलडी पाणी मिळत असल्याचे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शासनाच्या निर्देशांनुसार १० टक्के पाणीकपातीचे धोरण असताना प्रत्यक्षात अधिक कपात झाल्याने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागासमोर नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे खारघर आणि तळोजातील उंचावरील तसेच नोडच्या शेवटच्या भागातील सोसायट्यांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच रहिवाशांच्या पाणी टंचाईविषयक तक्रारी वाढल्या.
या पार्श्वभूमीवर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी डॅशबोर्ड प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दिवसभरात कोणत्या सेक्टरमधून किती तक्रारी आल्या, रहिवाशांनी तसेच लोकप्रतिनिधींनी किती तक्रारी केल्या आणि कोणत्या सोसायट्यांना टँकरची गरज आहे, याची नोंद ठेवली जाते.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर सिडकोचे सहाय्यक अभियंते संबंधित सोसायटीतील पाणीटंचाईची पडताळणी करतात. त्यासाठी पाण्याच्या मीटरचे युनिट रीडिंग तपासले जाते. प्रत्यक्षात पाण्याची कमतरता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टँकर पाठविला जातो. टँकर सोसायटीत पोहोचल्यानंतर तेथील प्रतिनिधीची स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर पाणीपुरवठ्याची पावती सिडकोच्या संबंधित विभागात जमा केली जाते. डॅशबोर्डमुळे टँकर कुठे पाठविला, किती फेऱ्या झाल्या आणि पाणीपुरवठ्याची मागणी किती आहे, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे.
सध्या खारघर आणि तळोजासाठी १४ टँकरद्वारे दररोज १४० फेऱ्या केल्या जातात. याशिवाय सिडकोच्या संपूर्ण क्षेत्रात ४० टँकर कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून दिवसाला २८० ते ३०० फेऱ्यांचे नियोजन केले जाते. अधीक्षक अभियंता प्रशांत काळे आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंते या नियोजनावर देखरेख ठेवत आहेत.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना केवळ तक्रारींच्या आधारे निर्णय न घेता प्रत्यक्ष पाणीटंचाईची पडताळणी, टँकरच्या फेऱ्यांची नोंद आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. मात्र, नियमित पाणीपुरवठ्यातील कपात कायम राहिल्यास टँकरवरील अवलंबित्व कमी करण्याचे आव्हान सिडकोसमोर राहणार आहे.
खारघर आणि तळोजा परिसरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. टँकरच्या फेऱ्या आणि पाणीवितरणावर पारदर्शक व्यवस्थापनासाठी डॅशबोर्ड प्रणालीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येत असून, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून रहिवाशांना दिलासा देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. – डॉ. राजा दयानिधी, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संपुर्ण सिडको क्षेत्रात दिवसाला ३०० टॅंकरने पाणी पुरवठा…
सिडको क्षेत्रात जलजोडणी धारक आहेत. यांच्यासाठी ३६१ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र अपु-या पाणी पुरवठ्यामुळे सध्या सिडको क्षेत्रात ३११ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. यामुळे संपुर्ण सिडको क्षेत्राला ५० एमएलडीची पाण्याची तुट आहे. यामुळे सिडको ४० टॅंकरच्या माध्यमातून दिवसरात्र असे २८० ते ३०० टॅंकरमधून रहिवाशांची तहान भागविली जात आहे. सिडको मंडळ टॅंकर वाहतूकीचा खर्च रहिवाशांकडून घेत नाही. तर फक्त १० हजार लीटरसाठी १२५ रूपये दराने शुल्क आकारत आहे.
टॅंकरची मागणी करण्यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांनी संबंधित नोडच्या सहाय्यक अभियंत्यांच्या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजमध्ये सोसायटीचा पत्ता, सेक्टर, किती सदनिका व गाळेधारक आहेत, किती युनिट पाणी पुरवठा यापूर्वी होता सध्या किती याची माहिती द्यायची आहे.
