उरणमधील विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त ; शासकीय कार्यालये, बँका आदींच्या कामकाजावर परिणाम

उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

उरणमधील विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त ; शासकीय कार्यालये, बँका आदींच्या कामकाजावर परिणाम
( संग्रहित छायचित्र ) /लोकसत्ता

उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोकडविरा गावात मंगळवारी रात्री खंडित झालेली वीज बुधवारी सकाळी ९ वाजता आली. यामुळे शासकीय कार्यालये तसेच बँकांच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. तर दुसरीकडे व्यवसाय उद्योजकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ही नित्याची असली तरी पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतरही उरणमधील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील तहसील, पोलीस ठाणे, बँका, झेरॉक्स दुकाने येथील कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तर बोकडविरा गावातील वीज रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खंडित होऊन बुधवारी सकाळपर्यंत आली नव्हती. त्याचप्रमाणे उरणच्या पूर्व विभागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक तास नागरिकांना विजेअभावी रात्र काढावी लागत असल्याची माहिती चिरनेरमधील सामाजिक कार्यकर्ते जीवन केणी यांनी दिली.

या संदर्भात उरणचे महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता पावसामुळे अनेकदा जम्पर उडण्याच्या तसेच इतर कारणानेही वीजपुरवठा खंडित होत असली तरी ती तातडीने पूर्ववत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दुचाकीला अपघात झाल्याने सराईत चोरट्यांना अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी