शहरबात : निश्चय केला, पुन्हा नंबर पहिला

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत नवी मुंबई महापालिका चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.

विकास महाडिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत नवी मुंबई महापालिका चौथ्या क्रमांकावर घसरण झाली. गेल्या वर्षी किमान तिसरा क्रमांक आला होता. त्यामुळे नवी मुंबईकर खूश होते. दोन क्रमांक पार करून यंदा पहिला क्रमांक येईल या आशेवर नवी मुंबईकर होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून प्रयत्न केले. पहिला दुसरा तर सोडाच पण थेट एका क्रमांकाने आणखी पीछेहाट झाल्याने नवी मुंबईकर निराश झाले आहेत. त्यामागे राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे.

स्वच्छ भारत अभियानात पहिला नंबर मिळवण्यासाठी माजी पालिका आयुक्त एम. रामास्वामी आणि विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने गेली तीन वर्षे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याबद्दल टीका करणे योग्य नाही. शहरात दोन प्रकारचे नागरिक आहेत. एक नकारात्मक विचारसरणीचे आणि दुसरे सकारात्मक विचार करणारे. नकारात्मक विचारसरणीचे नागरिक पालिकेला मिळालेल्या पहिल्या गाडगेबाबा स्वच्छ पुरस्काराच्यातही उणेदुणे काढत होते तर सकारात्मक मंडळी पालिकेच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत होते.

इंदौर शहर देशात पहिल्या क्रमांकावर गेली सात वर्षे आहे. त्यामागे राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असली तरी तेथील जनतादेखील त्याला तेवढीच जबाबदार आहे. ‘इंदौर हमारा है’ असे ते अभिमानाने सांगतात. यात लहानथोर सर्वच मंडळींचा समावेश आहे. त्यांचे मुख्यमंत्री इंदौर या एका शहराला मिळालेल्या पुरस्काराचा स्वीकार करतात. पहिल्या क्रमांकाचे सातत्य ठेवण्यात यश येत असल्याने जल्लोष करतात. एक-दोन वेळा पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर आळसपणा न करता प्रशासन आणि नागरिक स्वच्छतेसाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी वर्षांला ४०० कोटी रुपये खर्च करीत आहेत.

इंदौर हे एक ऐतिहासिक शहर आहे. सुरत एक ‘बदसुरत’मधून सुंदर झालेले शहर आहे. दोन्ही शहरांना एक इतिहास आहे. या दोन्ही शहरांच्या तुलनेत नवी मुंबई हे एक वसविलेले निर्मित शहर आहे. या शहरात प्रकल्पग्रस्त वगळता कोणाची नाळ अपवादाने गाडली गेली आहे. त्यामुळे या शहराबद्दल येथील नागरीकांना जो आपलेपणा इंदौर, सुरत, विजयवाडा या शहराबद्दल आहे. तो दिसून येत नाही.

या शहरातला सायबर सिटी, एज्युकेशन हब, अशा बिरुदावलीबरोबरच बेड सिटी अशी पण एक उपमा लावली जाते. शहरातील लाखो जनता केवळ रात्री झोपण्यासाठी या शहरात येते. सकाळी उठल्यानंतर पुन्हा ही मंडळी पोटापाण्यासाठी आजूबाजूच्या शहरात निघून जाते. त्यामुळे या शहराबद्दल जिव्हाळा, प्रेम, माया हवी आहे ती दिसून येत नाही. हे शहर पहिले यावे यासाठी प्रशासन वगळता इतर संस्था, मंडळे, व्यक्ती, राजकीय पक्ष काम करताना दिसणार नाहीत. स्वच्छता राखा हे येथील जनतेला आजही सांगावे लागत आहे. त्यामुळेच ओला, सुका कचऱ्यांचे वर्गीकरण शंभर टक्के पूर्ण झालेले नाही.

ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी अशा तिन्ही वसाहतींमधून बनलेल्या या शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे तीन प्रकार आहेत. त्यामुळेच पालिका झोपडपट्टी भागात आजही शून्य कचरा झोपडपट्टी अभियान राबवावे लागत आहेत. या भागात लावण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयातील वस्तू दोन दिवसापेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी जाळ्या, संरक्षण लावण्याची वेळ येत आहे. हे शौचालय आपल्यासाठी आहे आणि त्याचे संरक्षण आपण करायला हवे ही मानसिकताच मुळात या शहरात रुजलेली नाही.

केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयाचे सचिव मिश्रा यांनी पालिकेच्या एका जाहीर कार्यक्रमात ऑनलाइन भाग घेऊन ‘नवी मुंबई अच्छा काम कर रही है’ असे प्रशस्तिपत्र दिले ही पहिला क्रमांक मिळाल्याची पोचपावती आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, मलवाहिन्या, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, क्षेपणभूमी, ह्य़ा देशातील इतर शहरांपेक्षा काकणभर अधिक आहेत. इंदौर आज आपला पहिला क्रमांक टिकवून आहे. आणखी काही काळ हा क्रमांक राहणार आहे मात्र ज्या वेळी इंदौर, सुरत या शहरांचा क्रमांक खाली येईल त्या वेळी केंद्र सरकारला नवी मुंबईशिवाय दुसरा पर्याय समोर शिल्लक राहणार नाही. त्या वेळी राजकीय इच्छाशक्तीदेखील नवी मुंबईला अनुकूल राहणार आहे. या स्पर्धेत पालिकेचा चौथा क्रमांक आला तरी पहिला क्रमांक येईपर्यंत प्रयत्न करीत राहाणे हे प्रशासन आणि नागरिक या दोघांच्या हाती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: City decided number one ysh

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी