विकास महाडिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मोठय़ा शहरात बोटावर मोजता येतील इतकेच गोल्फ कोर्स आहेत. महामुंबईत मात्र एकापाठोपाठ एक असे दोन गोल्फ कोर्स होणार आहेत. त्यातील एक गोल्फ कोर्स हा खारघर सेक्टर २२ मध्ये सिडकोने बांधला आहे. वास्तविक हा गोल्फ कोर्स १८ होलचा उभारला जाणार होता पण वन विभागाने पांडवकडय़ाच्या परिसरातील २२ एकर जमीन देण्यास स्पष्ट नकार दिल्याने सिडकोला या गोल्फ कोर्सच्या होलची संख्या कमी करावी लागली. पूर्वीच्या गोल्फ कोर्सची रचना आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात आली होती. वन विभागाने जमीन देण्यास नकार दिल्याने ही संख्या १८ वरून ११ होलची करण्यात आली आहे. ती जमीन मिळविण्याचा सिडको प्रयत्न करीत आहे. कमी होलच्या या गोल्फ कोर्समुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ खेळाडू या गोल्फ कोर्सकडे फिरकत नाहीत. त्यामुळे या गोल्फ कोर्सकडे त्यांना आकर्षित करण्यासाठी सिडकोने अनेक उपाययोजना कराव्या लागत आहेत.

गोल्फ कोर्स हा अतिश्रीमंतांचा खेळ मानला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांना या खेळाशी तसे काही देणे घेणे नाही. मूठभर मंडळींची इच्छा पूर्ण करण्यासाठी हजारो एकर जमीन या खेळाच्या मैदानासाठी खर्च केली जात आहे. खारघर येथील मोक्याची जमीन या खेळासाठी खर्च करताना सिडकोतील काही उच्च अधिकाऱ्यांनी हा खेळ खेळणारी श्रीमंत मंडळी असल्याने त्यांच्याकडे वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असतात. त्यामुळे हे गोल्फ कोर्स मैदान अडगळीच्या जागेत विकसित केले गेले तरी चालण्यासारखे आहे. त्याऐवजी या जमिनीवर सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसाठी गृहसंकुल राबविण्यात यावी असा अभिप्राय देण्यात आला. मात्र तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांची जीवनशैलीच तशी असल्याने सिडकोने हा मोक्याच्या ठिकाणी गोल्फ कोर्स उभारलेला आहे.

सिडकोचा प्रमुख हा सर्वसामान्यांची नाडी ओळखणारा नसला की अशा प्रकारचे महम्मद तुघलकी निर्णय घेऊन मोकळे होतात. सिडकोसाठी हा गोल्फ कोर्स एक पांढरा हत्ती म्हणून सध्या पोसला जात आहे. या गोल्फ कोर्सच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सिडकोचे आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत. केवळ दहा किलोमीटर अंतरात हा एक गोल्फ कोर्स असताना सिडकोने पामबीच मार्गावरील नेरुळ सेक्टर ६० मधील एका गृहप्रकल्पाला बांधकाम परवानगी दिली आहे. ३५ हेक्टर जमिनीवर उभा राहणारा हा गोल्फ कोर्ससह प्रकल्प सिडकोच्या मालकीचा नाही पण यासाठी सिडकोने घेतलेले परिश्रम सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहेत. पामबीच मार्गावर पश्चिम बाजूस असलेल्या एकूण ८० हेक्टर जमिनीचे सरकारने ऑक्टोबर २०१६ रोजी आरक्षण उठविले आहे. घनदाट झाडी, कांदळवन आणि पाणथळ जमीन असलेल्या या भागात अगोदर प्रादेशिक वनीकरण असलेले आरक्षण एक दिवसात निवासी क्षेत्र करण्यात आलेले आहे. राज्य शासनाने उठविलेल्या या आरक्षणामागे एका विकासकाचे भले  करण्याचा हेतू होता हे स्पष्ट आहे. ही जमीन येथील प्रकल्पग्रस्तांकडून वाशीतील एका विकासकाने ४० वर्षांपूर्वी कवडीमोल दामाने घेतलेली आहे. पाणथळ, खारजमीन, कांदळवन असलेली ही जमीन आता काही उपयोगाची नाही म्हणून प्रकल्पग्रस्तांनी विकून टाकली. त्याचे आता सोने होण्याची वेळ आली आहे. सिडकोने ही जमीन संपादित न केल्याने ती त्या विकासकांच्या ताब्यात होती. या ठिकाणी एखादा प्रकल्प व्हावा यासाठी हा विकासक गेली १८ वर्षे प्रयत्ना करीत होता. मात्र त्याला अलीकडे यश आले आहे. ही संपूर्ण जमीन देशातील एका उद्योजकाने (ऑफ द रेकॉर्ड) घेतली आहे. त्यामुळे जुन्या विकासकाला आता झटपट परवानग्या मिळत आहेत. गेली अनेक वर्षे आरक्षण उठल्यामुळे विकासकाने १७ इमारतींचा आराखडा तयार केला असून तो महारेराकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सिडकोच्या उत्तर नवी मुंबईतील पालिका क्षेत्राचे सर्व नियोजन व बांधकाम परवानगीचे अधिकार हे पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र केवळ या क्षेत्राचे बांधकाम परवानगी अधिकार हे सिडकोकडे ठेवण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर उभा राहावा आणि पामबीच मार्गावर एक उच्चभ्रू लोकवस्तीसाठी दुसरा गोल्फ कोर्स कार्यान्वित व्हावा असा या मागचा उद्देश आहे.  ही सर्व जमीन पाणथळ असल्याचा निर्वाळा अहमदाबाद येथील एका संस्थेने दिला आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात फ्लेिमगो पक्षी संचार करतात. त्यांचे थवेच्या थवे या भागात तासनतास बसल्याचे नवी मुंबईकरांनी अनेक वेळा पाहिले आहे. ८० हेक्टरचा हा भाग सोडून उत्तर दक्षिण भागात एक निवासी व एक प्रशिक्षण केंद्र आहे. या मोकळ्या भागात आता गोल्फ कोर्स युक्त गृहप्रकल्प उभा राहणार आहे. दीड हजारापेक्षा जास्त रहिवासी या गृहप्रकल्पात राहण्यास येणार आहेत. हा गोल्फ कोर्स आणि गृहप्रकल्प नवी मुंबई विमानतळाला पूरक आहे. त्यामुळे तो व्हावा यासाठी अनेक अधिकारी व पदाधिकारी पाच सहा वर्षे काम करीत आहेत. त्यांचे या प्रकल्पात चांगभलं होणार आहे. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. येथील नैर्सगिक जैवविविधतेच्या जीवावर उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पाच्या विरोधात येथील काही सामाजिक कार्यकत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हा गृहप्रकल्प रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात राज्य व सिडकोच्या वतीने नेण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला अगोदरच या प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे. पर्यावरणाच्या लागणाऱ्या परवानग्या मिळत गेल्याने महारेरा देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकल्प उभारणारा विकासक हा प्रबळ आहे. त्याच्या मागे आता देशातील तो सर्वाधिक श्रीमंत उद्योजक आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल होणार असून हा गोल्फ कोर्स प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईकर जनतेला प्राणवायूचा पुरवठा करणारे हे जंगल, तेथील कांदळवन, पाणथळ, पशु-पक्षी यांचे वास्तव्य संपुष्टात येणार आहे, याचे सोयर सुतक नाही. या भागातील वृक्षसंपदेची कत्तल डोळ्यासमोर होत असताना जनता गप्प आहे. सर्वोच्च  न्यायालयातील लढाई लढण्यास सामाजिक कार्यकत्र्यांकडे आर्थिक बळ नाही. त्यामुळे विकासक, उद्योजक, अधिकारी, पदाधिकारी यांना अभिप्रेत असलेले सुसज्ज, अद्ययावत असा दुसरा गोल्फ कोर्ससह उच्चभ्रूंचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला नवी मुंबईकरांना लवकरच उभा राहणार असे दिसून येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City golf course cidco ysh
First published on: 07-12-2021 at 01:18 IST