सुशांत मोरे
मेट्रो रेल्वे, वातानुकूलित बेस्ट बस, ॲप आधारित वातानुकूलित टॅक्सी असा गारेगार व स्वस्त प्रवास मुंबई महानगरात मिळत असतानाच लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरूप बदलत आहे. चार वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. तरीही या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद प्रवाशांनी दिला नाही. अवाच्या सवा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठच फिरवली. आता रेल्वे मंत्रालयाने तिकीट दर कमी करून प्रवाशांना दिलासा दिला. मात्र दररोज प्रवास करणाऱ्यांमध्ये पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच आहे. त्यामुळे पास दरात कपात करून दिलासा कधी मिळेल, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावली. पाठोपाठ सीएसएमटी ते पनवेल, गोरेगावही सेवेत आली. परंतु सुरुवातीपासून या मार्गावरील लोकल गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद मिळावा यासाठी मध्य रेल्वेकडून जलद मार्गावर लोकल चालवण्याचा प्रयोग पुढे आला. तसेच या लोकलचा विस्तार अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळय़ापर्यंतही केला. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बरवर दिवसाला ६० फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर २० फेऱ्या वातानुकूलितच्या होतात. वाढलेल्या उकाडय़ामुळे पाच वर्षांच्या प्रतीक्षेत पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीच्या सकाळी व सायंकाळच्या मोजक्या फेऱ्यांना गर्दी होऊ लागली आहे. एकीकडे मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाच समानधानकार प्रतिसाद असला, तरीही हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसादाची अपेक्षा आहे. प्रवाशांचा प्रतिसादच मिळत नसल्याने हार्बरवर होत असलेल्या वातानुकूलित लोकलच्याही उर्वरित १६ फेऱ्याही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळासाठी चालवण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णयही होईल.
भाडेदर महत्त्वाचा मुद्दा
वातानुकूलित लोकलचे भाडेदर हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. अवाच्या सवा भाडे आणि त्यामुळे वातानुकूलित लोकलचे दर कमी करावे, अशी मागणी गेल्या चार वर्षांत प्रवासी करू लागले आणि ते होत नसल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठच फिरवली. दर कमी झाल्यासच प्रतिसाद मिळू शकतो, असे तर्क लावण्यात आले. दर कमी करावे की नाही यासाठी पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेच्या मदतीने जून २०२१ मध्ये प्रवासी सर्वेक्षणही केले. ४० टक्के प्रवाशांनी सामान्य बारा डबा लोकलमधील तीनच डबे वातानुकूलित आणि ९ डबे विनावातानुकूलित करावे, असे मत नोंदवले. अशा अर्ध वातानुकूलित लोकलबाबत विविध सूचनाही प्रवाशांनी केल्या. या सर्वेक्षणात महत्त्वाची बाब म्हणजे ७० टक्के प्रवाशांनी मात्र वातानुकूलित लोकलचे भाडे हे सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी भाडेदराच्या फक्त दहा टक्केच अधिकच असावे असे मत नोंदविले. महत्त्वाची बाब म्हणजे खासगी वातानुकूलित बस, टॅक्सी किंवा वैयक्तिक वाहनांपेक्षा ६५ प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवासाला पसंती दिली.
संपूर्ण वातानुकूलित लोकलला रेल्वेची पसंती
एकूणच सर्वेक्षण पाहता अर्धवातानुकूलित लोकल चालवताना येणाऱ्या तांत्रिक समस्या पाहता तिकीट दर कमी ठेवून संपूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्यास रेल्वेने पसंती दिली. याचा सारासार विचार करून रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली. तर सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीच्या तिकीट दरातही जवळपास तेवढय़ाच प्रमाणात दर कमी केले. प्रथम श्रेणीचे तिकीट दर कमी करण्यामागील उद्देश म्हणजे या श्रेणीचे प्रवासी वातानुकूलित लोकल गाडीकडे वळते करणे. जेणेकरून वातानुकूलित लोकलगाडीला प्रतिसाद वाढेल.
पास दरात कपातीची मागणी
तिकीट दरातील कपातीचे प्रवाशांनी स्वागत केले असले, तरीही पास दरात कपात झाली असती, तर ते अधिक समाधान ठरले असते. मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेवर सामान्य लोकलचे दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांपेक्षा पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. १०० टक्के प्रवाशांमध्ये ८० ते ९० टक्के प्रवासी पासधारक आहेत. हीच स्थिती काहीशी वातानुकूलित लोकलचीही आहे. हे प्रमाण पाहता पासदरात कपात का नाही, असा सवाल उपस्थित होतो. पास दरात कपात केल्यास सामान्य लोकलचा प्रवासी मोठय़ा संख्येने वातानुकूलित लोकलकडे वळेल. सामान्य लोकलसाठी मासिक, त्यानंतर त्रमासिक, साप्ताहिक आणि एका वर्षांच्या पासाची सुविधा आहे. वातानुकूलितसाठी या पास सुविधा देतानाच एका आठवडय़ाचा आणि पंधरा दिवसांचाही पास उपलब्ध केला आहे. त्यामुळे या सर्व पास सेवांना प्रतिसाद मिळेल.
पास काढूनही प्रवास परवडणारा
पास दरात कपात करणे सध्या रेल्वेला परवडणारे नाही आणि ते शक्यही नसल्याचे रेल्वेकडूून वारंवार स्पष्ट करण्यात आले. त्यामागील अनेक कारणे आणि दाखलेही दिले. यात मोबाइल ॲप आधारित टॅक्सीसह अन्य परिवहन सेवांशीही तुलना केली. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंतचा मासिक पास १,७७५ रुपये आणि विरापर्यंतचा पास २,२०५ रुपये आहे. तर सीएसएमटी ते कल्याणपर्यंतही पासासाठी २,१३५ रुपये मोजावे लागतात. गर्दीच्या वेळी मोबाइल अॅअप आधारित टॅक्सीने दक्षिण मुंबई ते कल्याणपर्यंत एका दिशेने प्रवास केल्यास ८०० ते ९०० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त मोजावे लागतील. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत प्रवासासाठी साधारण एवढीच रक्कम अदा करावी लागेल. तर परतीचा प्रवासही केल्यास एवढीच रक्कम होईल. त्यामुळे वातानुकूलित लोकलशी तुलना केल्यास प्रवाशांना पास काढून होणारा प्रवास परवडणाराच असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शिवाय वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी विजेचा वापर सामान्य लोकलपेक्षा अधिक होतो. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी पास दरात कपात नाही.