नवी मुंबई : अमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांची मागणीच निर्माण होऊ नये, यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. नेरूळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ एक्सलन्स येथे नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला.
देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ही युवाशक्ती असून ती भारताची मोठी ताकद आहे. या युवाशक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रूराष्ट्रे आणि समाजविघातक घटक तरुणांना व्यसनांच्या आहारी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळे अमली पदार्थांविरोधातील लढाईत पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच तरुणांमधील मागणीची बाजू संपविणे आवश्यक आहे. त्यासाठी ३६० अंशांचा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयीन परिसर हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयात योग्य माहिती आणि जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे नशाविरोधी लढ्याचे केंद्र बनले पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी या मोहिमेचा सैनिक झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
व्यसनाधीन विद्यार्थ्यांना मदतीचा हात
व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार किंवा वेगळे घटक म्हणून न पाहता त्यांना व्यसनमुक्ती केंद्रांच्या माध्यमातून मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि कौशल्यविकासाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबई पोलिस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाई यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शहर पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र तसेच व्यसनमुक्तीवरील चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. जनजागृतीसाठी आयोजित पोस्टर आणि ‘रील्स’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री भरत गोगावले, आमदार मंदाताई म्हात्रे, महेश बालदी, रविंद्र फाटक, विक्रम पाटील, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
