cm uddhav thackeray praise cidco work zws 70 | सिडकोचे कार्य कौतुकास्पद | Loksatta

सिडकोचे कार्य कौतुकास्पद

सिडकोने आरोग्य व्यवस्था उभारणीत हातभार लावला असून पहिल्या लाटेत मुलुंड येथे जम्बो रुग्णालय उभारले होते.

सिडकोचे कार्य कौतुकास्पद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे गौरवोद्गार

नवी मुंबई : करोनाकाळात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिडकोने आरोग्य व्यवस्था उभारणीत हातभार लावला असून पहिल्या लाटेत मुलुंड येथे जम्बो रुग्णालय उभारले होते. तर दुसऱ्या लाटेत कांजुरमार्ग व कळंबोली येथेही करोना केंद्रांची उभारणी केली आहे. या दोन केंद्रांचे शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे उद्घाटन केले. नवी मुंबईच्या सवार्र्गिण विकासासाठी सिडकोने आतापर्यंत केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.

या आरोग्य केंद्रांसह  यावेळी ‘सिडको इन्व्हेस्टमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिट’चेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सिडकोच्या या उपक्रमामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळून हे शहर गुंतवणूकदारांना व नागरिकांना आकर्षित करणारे ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सिडकोचे कौतुक केले.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, पनवेलचे महापौर कविता चौतमोल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

कळंबोलीत ६३५ तर कांजूरमार्ग येथे १,७३८ खाटा

कळंबोली येथील करोना आरोग्य केंद्र हे वातानुकूलित असून या केंद्रामध्ये एकूण ६३५ खाटा आहेत. त्यात ५०५ प्राणवायू, १२५ अतिदक्षता (यातील २५ लहान मुलांसाठी समर्पित), तसेच ५ खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी २४ खाटांचे कक्ष प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे केंद्रात संपर्करहित तपासणी कक्ष, सीसीटीव्ही, वायफाय प्रणाली व इतर सुविधांनीयुक्त विकसित करण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथील केंद्रात १,७३८ खाटांपैकी ११५६ प्राणवायूयुक्त खाटा, ३७२० विलगीकरण तसेच १० खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत. अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ४४ खाटांचे कक्ष प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे २१० अतिदक्षता खाटा असून यातील २० खाटांसाठी जीवरक्षक प्रणालीची सुविधा आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-10-2021 at 00:48 IST
Next Story
नवी मुंबईत तब्बल १२५ कोटींच हेरॉईन जप्त ; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई