नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली असून, या उत्सवादरम्यान अनेक ठिकाणी देवींच्या मुखवटय़ांचे पूजन करून त्यांचे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे. या मुखवटय़ासाठी नारळाच्या शहाळ्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे शहाळ्यापासून देवीचा मुखवटा तयार करण्याची कला उरणच्या नागाव येथील पाटील कुटुंबीयांनी जपली आहे. ४० वर्षांपासून असे मुखवटे तयार केले जात असून रायगडसह ठाणे, मुंबई व नवी मुंबईमधून नवरात्रोत्सवाच्या काळात या मुखवटय़ांना मोठी मागणी आहे.
शहाळ्याच्या भागाला आकार देऊन उरण तालुक्यातील नागावचे ६१ वर्षीय दिलीप पाटील देवीचे मुखवटे तयार करण्याचा व्यवसाय करतात. ४० वर्षांपासून हा व्यवसाय ते करीत असून या कामात त्यांचे कुटुंबीय, मित्र त्यांना मदत करतात. नवरात्रोत्सवाच्या किमान १५ ते २० दिवस अगोदर या मुखवटय़ांची मागणी नोंदवली जाते. दरवर्षी किमान २०० पेक्षा अधिक मुखवटय़ांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. ही कला पुढच्या पिढीनेही जपावी अशी त्यांची इच्छा आहे.