एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी शहरात आचारसंहिता; विकासकामांची मंजुरी अडली
जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याने नगरसेवक पद रद्द झालेल्या दिघा इलटणपाडा येथील प्रभाग क्रमांक-६ मध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण शहरात लागू करण्यात आल्याने स्थायी समिती सभांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत नाही तोपर्यंत नागरी कामांच्या खर्चाला सहमती मिळणार नाही. या प्रभागात १८ एप्रिल रोजी निवडणूक होण्याची शक्यता असून हा प्रभाग म्हणजे मिनी उत्तर प्रदेश आहे. या ठिकाणी बाहुबली असलेले माजी नगरसेवक रामआशीष यादव यांची बहीण संगीता यादव ह्य़ा नगरसेविका होत्या; पण त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक-६ (यादवनगर) मधून संगीता यादव या प्रभागातून निवडून आल्या होत्या. त्यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने कोकण विभागीय आयुक्तांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले.
ठाणे, पिंपरी आणि औरंगाबाद येथील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांत राज्य निवडणूक आयोगाने ४ मार्च रोजी या प्रभागात आचारसंहिता लागू केली. त्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता केवळ एका प्रभागापुरती मर्यादित आहे, पण महासभा आणि स्थायी समिती सभा निवडणूक होईपर्यंत न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
शहरासाठी घेतलेले निर्णय त्या प्रभागातील मतदारांना प्रभावित करण्याची शक्यता यामागे वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पालिकेच्या स्थायी समिती बैठकींना सुट्टी देण्यात आली आहे, तर प्रभाग समित्यांचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती निवडीला स्थगिती दिल्याने प्रलंबित आहे.
त्यामुळे नगरसेवक निधी किंवा प्रभाग निधीची कामे होत नसल्याने नगरसेवक बिथरले आहेत. त्यात ह्य़ा पोटनिवडणुकीमुळे नागरी कामांना चाप लागल्याने ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती नगरसेवकांची झाली आहे.
या पोटनिवडणुकीची कुणकुण पालिका प्रशासनाला लागली असल्याने मार्च महिन्याची सभा ४ मार्च रोजी आटोपून घेण्यात आली आहे. एप्रिल महिन्याची सभा २० एप्रिलपूर्वी घेण्याचे बंधन असल्याने त्यापूर्वी ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.