‘हार्बर’चा विस्तार; पनवेल ते सीएसएमटी वातानुकूलित लोकलच्या दोन फेऱ्या

पनवेल : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या दोन महत्त्वाच्या रेल्वे सेवा बुधवारपासून पनवेल व नवी मुंबईच्या प्रवाशांना मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘हार्बर’चा गोरगावपर्यंत विस्तार केल्याने दोन वेळा लोकल पकडण्याची कटकट संपणार असून पनवेल ते ‘सीएसएमटी’साठी वातानुकूलित लोकलमुळे गारेगार प्रवास करता येणार आहे.

बुधवारी सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांची पहिली लोकल गोरेगावसाठी रवाना झाली. ओ. आर. गुप्ता हे या लोकलचे मोटरमन होते. अनेक महिला प्रवाशांनी या पहिल्या लोकलमधून प्रवास केला. त्यांनी या सेवेचे स्वागत केले आहे.

पनवेलहून दररोज कामासाठी गोरेगावला जावे लागते. यापूर्वी दोन लोकल बदलून जावे लागत होते. हा प्रश्न आता सुटला आहे, याचा आनंद आहे. पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या पाहिजेत, असे प्रवासी राम भोसले यांनी सांगितले.

या सेवेमुळे आता पनवेल स्थानकातून थेट २० रुपयांच्या तिकीटभाडय़ात गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी पनवेलच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासासाठी वडाळा रेल्वे स्थानकावर उतरून दुसरी लोकल पकडावी लागत होती. मात्र दिवसभरातून होणाऱ्या १८ फेऱ्यांमुळे हा प्रश्न सुटला आहे.

थेट गोरेगावसह कांदिवली, मालाड आणि जोगेश्वरी येथे जाणाऱ्या पालकांना मुलांना घेऊन सोबत फलाट बदलण्याचा त्रास वाचला आहे. फक्त या लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी हीच अपेक्षा आहे असे महिला प्रवासी रिना गुप्ते यांनी सांगितले.

१८५ रुपयांत गारेगार प्रवास

पनवेल रेल्वे स्थानकातून ठाणेपर्यंत जाण्यासाठी यापूर्वी वातानुकूलित लोकल होती. बुधवारपासून सकाळी पाच वाजून ४६ मिनिटांची पहिली छत्रपती शिवाजी टर्मिनलकडे जाणारी वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाली. या पहिल्या वातानुकूलित लोकलचे मोटरमन चिरंजीवलाल हे होते. दिवसाला दोन लोकल रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वांवर सुरू केल्या आहेत. या पहिल्या लोकलमध्ये तुरळक प्रवासी असले तरी गारेगार प्रवासाची ही लोकल हार्बर मार्गावरील सर्वच प्रवाशांची आकर्षण ठरणार आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना १२ पटीने अधिकचे १८५ रुपये तिकीटभाडे द्यावे लागणार आहे.

पनवेलमधून दैनंदिन ५० मेल एक्स्प्रेस

पनवेल रेल्वे स्थानक सर्वात मोठे टर्मिनल झाले आहे. येथून सुमारे ३९६ पर्यंत विविध रेल्वे गाडय़ा सुटतात. यामध्ये ८० ते ८५ मालवाहू रेल्वे आणि ५० मेल एक्स्प्रेस (बाहेरगावी जाणाऱ्या) आणि २६१ लोकल आहेत.

लढा सुरूच राहील: रेल्वे प्रवासी संघ

पनवेल ते बोरिवलीपर्यंतचा रेल्वे प्रवास प्रवाशांना करता यावा यासाठी स्थानिक प्रवासी संघ लढा देत आहे. त्याचा एक टप्पा आज पार पडला. पनवेलच्या प्रवाशांना मुंबईच्या बोरिवलीपर्यंत विनासायास प्रवास करता येईल त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रवाशांचा विजय झाला असे म्हणता येईल अशा भावना रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या. पाटील यांच्यासोबत बुधवारी पनवेल प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे, श्रीकांत बापट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुदाम पाटील, पनवेल रेल्वे प्रबंधक जगदिश्वर प्रसाद मीना आदींनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.

पनवेल-अंधेरी लोकलमुळे वडाळ्याला उतरून फलाट बदलण्याचा त्रास थांबला होता. मात्र अंधेरीच्या पुढे जाण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागत होती. आता गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत थेट प्रवास करता येणार आहे, याचा आनंद आहे.

कुसुम शिंदे, महिला प्रवासी