दसऱ्याचा मूहर्तावर प्रकल्प शुभारंभात मोठी घट

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात सर्वाधिक बांधकाम सुरू असलेल्या महामुंबईत यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावरदेखील मंदी असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत दसऱ्याच्या दिवशी नवीन गृहप्रकल्पांचा शुभारंभ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या ६० ते ७० पर्यंत असे. यंदा मात्र यात घट होत ही संख्या २५ ते ३० पर्यंत खाली आली आहे.

विशेष म्हणजे ही सर्व नवीन बांधकामे नवी मुंबईच्या दक्षिण भागात रायगड जिल्ह्यात सुरू होणार आहेत. महामुंबई क्षेत्रात सध्या तयार बांधकामांना मागणी आहे, पण नवीन गृहप्रकल्पात घर आरक्षण करण्याच्या फंदात ग्राहक पडत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे.

मुंबईच्या पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर शेवटच्या टोकाला होणाऱ्या बांधकामापेक्षा नवी मुंबईच्या हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. मुंबईतील अनेक नोकरदार या विकसित क्षेत्राला जास्त पंसती देत असल्याने अनेक छोट्या-मोठ्या विकासकांनी या भागात बांधकाम करण्यास प्राधान्य दिले आहे. सिडकोने तर नवी मुंबईच्या दक्षिण व उत्तर भागात ६५ हजारांपेक्षा जास्त घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात २४ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. सिडकोच्या घरांना चांगली मागणी असल्याने लाखो अर्ज घर आरक्षणासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. सिडकोचे घर सोडतीत न मिळणारे ग्राहक खासगी विकासकांकडे वळत असल्याने सिडकोबरोबरच खासगी विकासकांचे बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नवी मुबंई विमानतळ प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी पुष्पकनगर भागात विकासकांबरोबर भागीदारी करून गृहप्रकल्प तयार केले आहेत. या क्षेत्रात एकाच वेळी पाच ते सहा हजार गृहप्रकल्प असून येथील घरे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आहेत.

सर्वसाधारपणे दसरा, दिवाळीत या नवीन गृहप्रकल्पांची सुरुवात होत असल्याने नवी मुंबई बिल्डर असोसिएशनच्या कार्यालयात या दिवसाच्या गृहप्रकल्पांच्या भूमिपूजनांची ६० ते ७० निमंत्रण येत असल्याचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष हरेश छेडा यांनी सांगितले. मात्र यंदा ही संख्या अर्ध्यावर आली आहे. पण गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या निश्चितच सुखवणारी आहे.

दोन, चार वर्षे प्रकल्प न करण्याची मन:स्थिती

महामुंबईत सध्या २७ हजारांपेक्षा जास्त घर विक्रीसाठी तयार आहेत. मागील दोन वर्षे या बांधकाम व्यवसायाला मरगळ आली आहे. करोना साथीचा फटका विकासकांना बसला आहे, पण त्याचबरोबर महागाईने विकासकांचे कंबरडे मोडून टाकले आहे. रेती, खडी विटा, सिमेंट आणि स्टील या बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे कंत्राटदार कोणता दर बांधकामांचा लावतील याचा अंदाज विकासकांना येत नाही. त्यामुळे नवीन प्रकल्पांना विकासक हात घालत नाहीत. त्याचबरोबर सरकारी परवानगी घेत असताना नाकीनऊ येत असल्याने पुढील दोन, चार वर्षे प्रकल्प न करण्याचा निर्णयही काही विकासकांनी घेतले आहेत, तर काही विकासक भूखंड विकण्याच्या तयारीत आहेत. इंधनाच्या भरमसाट दरवाढीमुळे वाहतूक खर्चदेखील कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा हसरा नसल्याची प्रतिक्रिया अनेक विकासक व्यक्त करीत आहेत. मात्र या प्रतिकूल परस्थितीही २५ ते ३० विकासकांनी गृहप्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे छेडा यांनी सांगितले.

गेल्या वर्षी करोना साथीची सुरुवात झाल्याने दसऱ्याला केवळ ८ विकासकांनी नवीन प्रकल्पांची सुरुवात केली होती, पण ही संख्या यंदा तीनपट वाढल्याचे समाधान आहे.

-हरेश छेडा, माजी अध्यक्ष, नवी मुंबई बिल्डर असोसिएशन