खारकोपर-उरण सेवा सुरू होण्याच्या हालचाली

उरण : बेलापूर(सीवूड) ते उरण या प्रलंबित रेल्वे मागार्वरील जासई ते उरण दरम्यानच्या स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यापैकी काही रेल्वे स्थानकांच्या नामकरणामुळे स्थानिकांच्या अस्मितेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या मागार्वरील स्थानकांच्या नव्या नावाची मागणीही होऊ लागली आहे. मात्र १९९७ पासून प्रलंबित असलेली रेल्वे सेवा दृष्टिक्षेपात असल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. उरण तालुक्याला नवी मुंबईला जोडण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर ते उरण हा २७ किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गावरील सीवूड्स ते उलवे नोडमधील खारकोपर ही सेवा सुरू झाली आहे.  मात्र गव्हाण ते जासई मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा मार्ग रखडला होता. भूसंपादनाची समस्या मार्गी लागली असल्याने जासई ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गावर येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या कामाला वेग आला आहे.

यामध्ये जासई, रांजणपाडा, जेएनपीटी(नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) व उरण शहर या रेल्वे स्थानकांच्या बांधकामांना वेग आला आहे. स्थानकात फलाटे तयार झाली असून रेल्वे मार्गही बसविण्यात आले आहे. यातील रांजणपाडा स्थानकाच्या छपराचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरणमध्ये रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते हे नागरिकांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त केले जात आहे. 

नावांच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर

उरण ते बेलापूर मार्गावरील स्थानकांमध्ये नवघर परिसरात स्थानकाला जेएनपीटी स्थानक त्याचप्रमाणे बोकडविरा स्थानकाला द्रोणागिरी नाव देण्यात आले आहे. तर उरण स्थानकाला कोटनाका असे नामकरण करण्याची मागणी येथील स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. रेल्वे सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारच्या स्थानकांच्या नावाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याची दखल न घेतल्याने बोकडविरा येथील ग्रामस्थांनी या स्थानकाचे बोकडविरा नामकरण करून त्याचे फलकही झळकवले आहेत. त्यामुळे गावाच्या नावांच्या अस्मितेचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता वाढली आहे.