चौकांतील रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक उखडून नव्याने बांधकामाचा घाट
रोड व्हिजनच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण केल्यानंतर पालिकेने आता काही चौकांच्या काँक्रीटीकरणाचा चंग बांधला आहे. यासाठी आधी बसवलेले पेव्हर ब्लॉक उखडून त्या जागी चौकातील चारही रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यात कंत्राटदारांचे चांगभले करण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनी शहरातील रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यासाठी रोड व्हिजन सुरू केले होते. त्यासाठी अभियंता विभागाच्या वतीने कोटय़वधी रुपयांची तजवीज केली होती. त्यामुळे नाहटा यांचेही नंतर निवडणूक व्हिजन पूर्ण होऊ शकले होते. त्यामुळे एमआयडीसीसह शहरातील सर्व रस्ते सिमेंट क्राँक्रीटचे होत असून पावसाचे पाणी झिरपण्यासाठी जमीन शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यात कमी म्हणून की काय सोसायटी, असोसिएशनमधील बैठय़ा घरांसमोर असलेल्या मोकळ्या जागा पेव्हर ब्लॉकने बुजवून टाकण्यात आलेल्या आहेत. त्याचा परिणाम शहरात वाढलेल्या अधिक तापमानाने जाणवू लागला आहे. सिमेंट क्राँक्रीटीकरणामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून आता काही वर्दळीच्या चौकात ही प्रक्रिया सुरू आहे. ऐरोली सेक्टर सहा, सात आणि आठमधील काही चौकांचे चारही बाजूंनी २५ मीटर सिमेंट क्राँक्रीट केले जात आहेत. यातील काही चौकांत गतवर्षी पेव्हर ब्लॉक बसवून रस्ता मजबूत करण्यात आला होता, तर रायकर चौकातील रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्या ठिकाणी आता सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे काम मोठय़ा धूमधडाक्यात सुरू असून आवश्यक नसताना रस्ते खोदले जात आहेत. यात कंत्राटदारांचे चांगभले करण्याशिवाय दुसरा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पालिकेत अनेक घोटाळे आजही सुप्तावस्थेत आहेत. यात सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे रस्ते हा एक नवीन घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.