गोठवलीतील ‘त्या’ संकुलात आणखी तीन बाधित

नवी मुंबई : शहरात करोनाची उपचाराधीन रुग्णसंख्या २०७ असून प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले फक्त ५० रुग्ण शहरात आहेत. मात्र ब्रिटनवरून आलेल्या करोनाबाधित प्रवाशाच्या संपर्कातील बाधितांची संख्या वाढत असल्याचे चिंता वाढली आहे. बुधवारी आणखी तीन रुग्ण त्याच संकुलात आढळले आहेत.

शहरात मंगळवापर्यंत करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ०९ हजार ५२८ इतकी झाली असून १,९६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १,०७,२५२ जण करोनामुक्त झाले आहेत. सद्या शहरात करोनाबाधित उपचाराधीन रुग्णांची संख्या २०७ इतकी आहे. मात्र यातील फक्त ५० रुग्णांवर सद्या प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. यापैकी नेरुळ करोना काळजी केंद्रात १२ रुग्ण असून वाशी प्रदर्शन केंद्रात ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील तीन रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

 करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूची चिंता वाढली आहे. आतापर्यंत परदेशप्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्या होत्या.

मात्र मंगळवारी एका प्रवाशाची करोना चाचणी सकारात्मक आली. संपर्कात आलेल्या त्यांची आईही बाधित झाली तर ते राहत असलेल्या संकुलातील तीन जण बाधित आढळले. त्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असतानाच आता त्याच संकुलात आणखी तीन जण करोनाबाधित आढळले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र करोनाचे नियम पाळण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

अहवालाकडे लक्ष

 नवी मुंबई शहरात ब्रिटनमधून आलेल्या नागरिकाची व त्याच्या आईची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्याच इमारतीत राहणाऱ्या तीन जणांची चाचणी सकारात्मक आली असून यांच्या चाचण्या पुण्याला एनआयव्हीकडे पाठवल्या आहेत. त्यांचा अहवाल काय येतो याकडे लक्ष लागून आहे. ब्रिटनमधून परत आलेला प्रवासी राहत असलेल्या इमारतीमधील एकूण १७५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.