९५ टक्के किशोरवयीनांना पहिली लसमात्रा

नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले आहे.

१ फेब्रुवारीपासून दुसऱ्या लसमात्रेसाठी पालिका सज्ज      

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षांवरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तसेच दोन्ही लसमात्रांचे लसीकरण झालेली टक्केवारी ९५ टक्के इतकी आहे. ३ जानेवारीपासून नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या १५ ते १८ या किशोरवयीन गटातील लसीकरणासाठी ७३३७३ विद्यार्थी पात्र असून २०६ शाळांमध्ये लसीकरण करण्याचे पालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार वेगवान लसीकरणाद्वारे पालिकेने शहरातील ७३३७३ पैकी ७०१५९ किशोरवयीन गटातील म्हणजेच ९५ टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण केले आहे. तर या वयोगटातील मुलांना १ फेब्रुवारीपासून दुसरी लसमात्रा दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये प्रथम लसीकरण करण्यात आले. महानगरपालिका व खासगी अशा एकूण २०६ शाळांमधील २००७ किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या ७३ हजार ३७३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यातील ९५ टक्के मुलांना पहिली लसमात्रा मिळाली. १ फेब्रुवारीपासून दुसरी लसमात्रा मिळणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या सोयीने सर्व शाळांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लशीचा डोस दिला असून पहिली लसमात्रा घेऊन २८ दिवस झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी लसमात्रा १ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. सर्व पालकांनी शाळांकडून लसीकरणासाठी उपस्थित राहण्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्या वेळी मोबाइलसह उपस्थित राहून आपल्या पाल्याला दुसरी लसमात्रा द्यावी, असे आवाहन लसीकरणप्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी केले आहे.

लसीकरणामुळेच रुग्णसंख्या कमी

नवी मुंबईत तिसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असूनदेखील शहरात करोनाबाधितांची संख्या दररोज मोठी येत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. लसीकरण केलेल्यांना नक्कीच फायदा झाल्याचे निरीक्षण पालिकेकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरात इतर शहरांच्या तुलनेत सुव्यवस्थित व वेगवान लसीकरण करण्यात येत आहेत. किशोरवयीन गटातील ९५ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले असून १ फेब्रुवारीपासून याच वयोगटातील मुलांना दुसरी लसमात्रा दिली जाणार आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त,  नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona first dose adolescents ysh

Next Story
भारत पेट्रोलियम प्रकल्पाशेजारील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी