नवी मुंबई महापालिका शासनाकडे परवनगी मागणार
नवी मुंबई : नव्या नियमावलीनुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण झाले असल्याने निर्बंध कायम आहेत. मात्र नवी मुंबईतील लसीकरण ९५ टक्के झालेले असूनही निर्बंध कायम असल्याने उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना विचारले असता शासनाकडे परवानगी घेऊन उद्याने लवकरात लवकर खुली केली जातील, असे त्यांनी सांगितले आहे.
नवी मुंबई शहर हे उद्यानांचे शहर आहे. मात्र करोनामुळे गेली दोन वर्षे ती कुलूपबंद आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर ती खुली करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेच शहरात संसर्ग पसरल्याने ती पुन्हा बंद करण्यात आली आहेत. ती उघडण्याची मागणी होत आहे. तिसरी लाट ओसरल्याने शासनाने नवी नियमावली जाहीर करीत निर्बंध शिथिल केले आहेत, मात्र त्यासाठी लसीकरण हा नियम लागू केला आहे. पहिल्या मात्रेचे प्रमाण हे ९० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे प्रमाण हे ७० टक्के असणे आवश्यक आहे. नवी मुंबईत पहिल्या दोन्ही मात्रांचे ९५ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे शहरांतील निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मात्र शासनाने यासाठी जिल्हा गृहीत धरला आहे. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात येत असून ठाणे जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाणे ८७ टक्के इतकेच आहे. त्यामुळे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे नवी मुंबईतही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे शहरातील उद्याने खुली करण्यात आलेली नाहीत. उद्याने सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई शहरात ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील उद्याने सुरू करण्यासाठी महापालिका पातळीवर याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवून उद्याने सुरू करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.
– अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका
