पनवेल : गेल्या महिन्याभरात पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ७७,६२३ संशयितांची करोना चाचणी केल्यानंतर ६५८ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर उपचारांदरम्यान महिन्याभरात करोनामुळे १५ जणांचा मृत्यू झाल्यांची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीमुळे पालिका क्षेत्रात आतापर्यंत करोनामुळे मृतांची संख्या १३६३ वर पोहचली आहे.

पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासा देणारे म्हणजे ९७.८४ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक बरे होणारे ९८.६८ टक्के रुग्ण हे खारघर वसाहतीमधील आहेत. गेल्या महिन्यात २२ ऑक्टोबर या दिवशी ३४ रुग्ण आढळले होते. तर २२ नोव्हेंबरला आठ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या महिन्यात २२ ऑक्टोबरला पालिका क्षेत्रात विविध रुग्णालय व घरी उपचार घेणारे ३३४ रुग्ण होते. तर २२ नोव्हेंबर या दिवशी ११० रुग्ण संपूर्ण पालिका क्षेत्रात उपचार घेत आहेत.

पालिकेने गेल्या महिन्यात ७७,६२३ जणांची करोना चाचणी केली असून पालिकेने १० लाख करोना चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या महिन्यापासून आतापर्यंत पालिका क्षेत्रातील ८६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, नागरिकांनी करोनामुक्त शहरासाठी पालिकेच्या करोना चाचणी मोहिमेत साथ द्यावी असे आवाहन पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यापूर्वी अनेकदा केले आहे.

चाचणी सक्तीमुळे तंटे

पालिकेने रेल्वेस्थानक आणि डीमार्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी लावून करोना चाचणी सक्तीची केल्याने नागरिक व आरोग्य सेवकांमध्ये वादविवाद होत आहेत. शासनाने करोनाची चाचणी ऐच्छीक करा असा आदेश दिला असताना पालिकेचे आरोग्य सेवक कोणतीही लक्षणे नसताना करोना चाचणी सरसकट करून संबंधित चाचणीनंतर नमुने घेतलेल्या संशयितांना अहवाल देत नसल्याने नागरिक व आरोग्यसेवकांमध्ये तंटे होण्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.