नवी मुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर करोना नियमांची अनेक ठिकाणी पायमल्ली होताना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी वाशी येथील भावे नाटय़गृहात झालेल्या शिवसेनेच्या युवा मेळाव्यात या नियमांना हारताळ फासल्याचे दिसून आले. अशा प्रकारे वाशी येथील सेक्टर ९ मधील प्रमुख बाजारपेठ व एपीएमसी घाऊक बाजारात हे नियम पाळले जात नसल्याने करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जात आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

देशाला तिसरी लाट परवडणारी नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. असे असताना शहरात करोना नियमांना हारताळ फासला जात आहे. महापालिकेची दक्षता पथकेच गायब असल्याने आता गर्दीच्या ठिकाणीही मुखपट्टी घातली जात नाही. सुरक्षा अंतराच्या नियमाचा तर विसर पडल्याचे दिसत आहे.

लोकप्रतिनिधीही यात भर घालत आहेत. नाटय़गृह पन्नास टक्के क्षमतेने चालविण्याची परवानगी सरकारने दिली आहे. दोन दिवसांपूर्वी वाशीतील विष्णूदास भावे नाटय़गृहात झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात मात्र हे सभागृह तुडुंब भरले होते. त्यावर समाजमाध्यमांमध्ये मोठय़ा प्रमाणात टीका सुरू आहे. शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने भावे व्यवस्थापनाने देखील या गर्दीकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले.