आज फक्त दुसरी मात्राच; चार दिवस पुरवठा बंद
नवी मुंबई : करोनापासून सुरक्षेसाठी लस घ्या, असे आवाहन शासनासह महापालिका प्रशासन करीत आहे. मात्र केंद्रांवर लसच मिळत नसल्याने नागरिकांकडून संपात व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. २ जुलैनंतर गेले चार दिवस शहराला लसपुरवठाच न झाल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. काही निवडक केंद्रांवर फक्त दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरण सुरू आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व तिसऱ्या लाटेमध्ये डेल्टा प्लस विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करत आहेत. परंतु पालिकेला लसच मिळाली नाही तर पालिका लस देणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे तसेच चिंतेचे वातावरण आहे.
वेगात लसीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने १११
लसीकरण केंद्रांचे नियोजन केले आहे तर शहरात ७४ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत, पण लसीकरण केंद्र आहेत, पण लसच नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. लस उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासनाने पुढील ३ आठवडे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. मागील आठवडय़ात फक्त दोन वेळाच पूर्ण दोन्ही मात्रेचे लसीकरण झाले. या आठवडय़ात सोमवारी व मंगळवारीही फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण होत असल्याने यापुढेही लसीकरण विस्कळीत होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत २५ जून, २७ जून व त्यानंतर २ जुलै या तीनच दिवस पालिकेला लसपुरवठा झाला. तोही फक्त एक दिवस पुरेल इतकाच असल्याने पालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे.
नवी मुंबई महापालिकेने इतर महापालिकांच्या तुलनेत लसीकरण अधिक केले असून वेगात लसीकरण करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. परंतु लसच सुरळीतपणे प्राप्त होत नसल्याने फक्त दररोज लसपुरवठा कधी होणार याची वाट पाहावी लागत आहे. लस मिळताच तात्काळ लस नागरिकांना दिली जाते. मंगळवारीही फक्त कोवॅक्सिनची दुसरी मात्रा ठरावीक लसीकरण केंद्रांवर दिली जाणार आहे.
– डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका
