नवी मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पालिका प्रशासनाने वेळीच निदान व उपचार यावर भर दिली असून यासाठी जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्यात येत आहेत. गेल्या १५ दिवसांत ९७ हजार जणांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी ७ हजार चाचण्या होत आहेत.

करोना रुग्णांचे दैनंदिन बाधितांचे प्रमाण शहरात स्थिर असून शंभरपेक्षा कमी झाले आहे. मात्र संभाव्य तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणे वेगाने पसरू नये म्हणून पालिका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. यासाठी ज्या इमारतीत करोनाबाधित रुग्ण सापडतो, त्या इमारतीतील सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. याशिवाय एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स, मार्केट अशा वर्दळीच्या ठिकाणीही चाचण्यांवर भर दिला आहे. शहराची लोकसंख्या साधारणत: १५ लक्ष असून त्यामध्ये १३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत करोना चाचण्या करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रस्थानी आहे.

१४ दिवसांतील चाचण्या

  • प्रतिजन चाचण्या : ७५०५९
  • करोनाबाधित : ६२५
  • नकारात्मक चाचण्या : ७४४३४
  • आरटीपीसीआर चाचण्या  : २२,५९७