नवी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ८० दिवसांपर्यंत खाली आलेला रुग्णदुपटीचा कालावधी आता १०८६ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. ही शहरासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध कायम आहेत.

शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याने ७३५ दिवसांवर गेला होता. परंतु दुसऱ्या लाटेचे संकट आल्यानंतर हा कालावधी फक्त ८० दिवसांवर आला होता. हा शहरासाठी मोठा धोका होता. यानंतर शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध व उपाययोजनांमुळे ही परिस्थिती बदलत गेली. दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी झाल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. मात्र सध्या करोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला असून तो १०८६ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे.

करोनाचे नवे रुग्ण कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. रुग्णदुपटीचा कालावधी जवळजवळ ३ वर्षांपर्यंत गेला आहे ही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

रुग्णदुपटीचा कालावधी

१५ जानेवारी  : ६३४ दिवस

२ फेब्रुवारी :  ७३५ दिवस

१६ फेब्रुवारी :  ५८१ दिवस

१ मार्च :  ३७५ दिवस

१ एप्रिल :  ८० दिवस

५ मे :  १९० दिवस

१ जून :  ८१६ दिवस

२८ जुलै :  १०८६ दिवस