लस घेण्यासाठी महापालिकेकडून लाभार्थींशी संपर्क

नवी मुंबई : शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्या ११ लाख ७ हजार नागरिकांपेक्षा अधिक जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा जास्तीतजास्त जणांना देण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. मात्र दुसरी मात्रा घेण्यासाठी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसत आहे. पालिकेकडे लसमात्रा आहेत, मात्र लाभार्थी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून आता दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थ्यांना संपर्क केला जात आहे.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरही लसीकरणाबाबत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पालिकेकडे लस होती मात्र लस घेण्यास निरुत्साह दिसत होता. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर लसीकरणासाठी रांगा लागू लागल्या होत्या. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना लस हा करोनावर सद्य:स्थितीत एकमेव उपाय असल्याने लस घ्या असे आवाहन केले आहे.

नवी मुंबईत ऐकूण लोकसंख्येच्या तुलनेत १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ही ११ लाख ७ हजार इतकी असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार शहराला संपूर्ण लसीकरणासाठी २२ लाख १४ हजार लस मात्रांची गरज आहे. आतापर्यंत ११ लाख १९ हजार २९१ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर ६ लाख ८९६ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. पात्र लाभार्थींचा विचार केला तर पहिल्या लसमात्रेचे कवच शहरवासीयांना मिळाले आहे. मात्र तरीही अजून पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरूच आहे. तर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण आतापर्यंत ५५ टक्क्यांच्या आसपास झाले आहे.

गणपती उत्सवानंतर करोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे लसीकरणासाठी रांगा लागत होत्या. मात्र पालिकेला लस मिळत नसल्याने नागरिकांना परत जावे लागत होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरातील लसीकरणाचे चित्र आता बदलले आहे. पालिकेकडे लस आहे, मात्र लस घेण्यास येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दैनंदिन सरासरी चार ते पाच हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. मात्र पालिकेकडे नियोजित लसीकरणापैकी लस शिल्लक राहत आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यांची कॉल सेंटर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू केली आहेत.  नागरी आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या दैनंदिन लसीकरणाच्या यादीनुसार ८४ दिवस आधी कोव्हिशील्ड तसेच २८ दिवस आधी कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना व कालावधी संपूनही दुसरी मात्रा न घेणाऱ्या लाभार्थ्यांना संपर्क सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी या माध्यमातून ७ हजारांहून अधिक नागरिकांना संपर्क करण्यात आला. त्यांना दुसरी मात्रा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

नवी मुंबईकर नागरिकांनी  करोना लशीची पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यावर लगेच नजीकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रावर जाऊन  दुसरी मात्रा घ्यावी व संपूर्ण लससंरक्षित व्हावे. -अभिजीत बांगर,  आयुक्त, महापालिका