१० लाख ९५ हजार जणांचे लसीकरण

नवी मुंबई : एकीकडे दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून ५० पेक्षा कमी येत असताना शहरात लसीकरणालाही वेग आला आहे. शहरातील लसीकरणास पात्र ११ लाख ७ हजार नागरिकांपैकी १०,९५,७६६ जणांना पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

महापालिका प्रशासन शासनाकडून पुरवठा होईल तसे शहरात लसीकरण करीत आहे. त्यात सामाजिक दायित्व निधीतूनही चांगले लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाला काहीशी गती प्राप्त झाली आहे.

काही नागरिक लसीकरण केंद्र दूर असल्यानेही लसीकरण करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यासाठीही प्रशासनाने  ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम हाती घेतली असून पालिकेचे आरोग्य पथक रुग्णवाहिनींसह त्या त्या ठिकाणी जात लसीकरण करीत आहे. त्यामुळे शहरातील १८ वर्षांवरील लसीकरणास पात्र असलेल्या ११ लाख ७ हजार नागरिकांपैकी १०,९५,७६६ जणांना पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ५,६२,२३३ इतकी असून हे प्रमाण ५१ टक्के इतके आहे.

नवी मुंबईतील लोकसंख्या ही १५ लाख गृहीत धरून त्यातील १८ वर्षांवरील लसीकरणास पात्र नागरिकांची संख्या सुरुवातीला १० लाख ८० हजार इतकी गृहीत धरण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वाढ होत ही संख्या ११ लाख ७ हजार इतकी झाली आहे.

आगामी काळात आवश्यक तेवढा व सातत्यपूर्ण लसपुरवठा झाल्यास उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.