नियमभंग केल्यास आस्थापनाला टाळे

शहरात कडक निर्बंध असणे गरजेचे झाले आहे.

‘एपीएमसी’त मुखपट्टीचा वापर होत नाही तर सामाजिक अंतरही पाळले जात नाही. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

नवी मुंबई, पनवेलसाठी नवे निर्बंध; ३५ पथकांची नियुक्ती

नवी मुंबई : बुधवारी नवी मुंबईत तीनशेपेक्षा जास्त करोना रुग्ण सापडल्यानंतर पालिका प्रशासनाने सायंकाळी शहरासाठी नवे निर्बंध लागू केले. यात सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृह, आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये, दुकाने अशा आस्थापना पूर्वीप्रमाणे म्हणजेच ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.  विवाह समारंभासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले तर, संबंधित आस्थापनांना करोना महासाथ संपेपर्यंत टाळे लावण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.

पनवेल पालिका आयुक्तांनीही शासनाने लागू केलेले हे नियम शहरात लागू केले आहेत.

नवी मुंबई पालिका प्रशासनाने बुधवारी १५५ जणांची नियुक्ती करीत ३१ पथके तयार केली आहेत. एपीएमसी बाजारात दिवसरात्र काम सुरू असते. त्यामुळे ही पथके दिवसरात्र या ठिकाणी कार्यरत राहतील असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

शहरात नियंत्रणात आलेली करोना परिस्थिती १ फेब्रुवारीपासून बिघडत चालली आहे. ५० पर्यंत असलेली दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापर्यंत दोनशेच्या घरात होती. मात्र यात वाढ होत बुधवारी शहरात ३१८ ने करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे पुढील काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहरात कडक निर्बंध असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी शहरासाठीचे नवे निर्बंध जाहीर केले आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणात मॉल असून अनेक मॉल, दुकाने, हॉटेल,रेस्टॉरन्टमध्ये मुखपट्टी व  सामाजिक अंतराचे नियम मोडले जात असल्याचे चित्र आहे. सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये तुुडुंब गर्दी होत आहे. येथील कर्मचारीही मुखपट्टीचा वापर करीत नाहीत. सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या एपीएमसीच्या बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. परिणामी शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आली असून यात बदल न झाल्याने निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे.

पालिकेने दुकाने व हॉटेल, मॉल यांच्या वेळांतही बदल केला आहे. मात्र तरीही गर्दी होत असल्याने आता या सर्व आस्थापनांत ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. धार्मिक स्थळ, दुकाने, मॉल, हॉटेलमध्ये मुखपट्टी घातल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ताप व प्राणवायू तपासल्यानंतरच ग्राहकांना प्रवेश द्यावा, प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण करावे असे नियम लागू केले आहेत. हे नियम न पाळल्याने सबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई तर केली जाईलच शिवाय त्यांना टाळे लावण्यात येईल.

पालिका प्रशासनाने शहरात लग्न समारंभ व हळदीच्या कार्यक्रमांवर अगोदरपासूनच निर्बंध घातले आहेत. यात ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहता येणार नाही. तर सामाजिक , राजकीय कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी फक्त २० जणांची उपस्थिती बंधनकारक केली आहे.

कारवाईचा बडगा

पालिका प्रशासनाने निर्बंध लागू करीत असताना त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १५५ जणांची नियुक्ती केली असून ३१ दक्षता पथके तयार केली आहेत. प्रत्येक विभागात दोन दक्षता पथके कार्यरत राहतील. तर एपीएमसी परिसरात दिवसरात्र काम सुरू असल्याने या ठिकाणी दक्षता पथकेही दिवसरात्र दक्ष असतील असे आयुक्तांनी सांगितले.

पोलीस व पालिका प्रशासन संयुक्त कारवाई

सदर कारवाई करताना एकटे पोलीस किंवा पालिका कर्मचाऱ्यांना मर्यादा येतात किंवा दरम्यान वादाचे प्रसंगही होऊ शकतात. त्यामुळे पोलीस व पालिका प्रशासन संयुक्त कारवाई करणार आहे.

विलगीकरणात असलेल्यांच्या घरावर फलक

करोना रुग्णाच्या सपंर्कात आलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या बाधितांना गृह विलगीकरणात ठेवले जाते. मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडून नये असे आवाहन करण्यात आले असून तसे आढळल्यास कायेदशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गृहविलगीकरणात असल्याचा फलक संबंधित व्यक्तीच्या घरावर लावण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नियम मोडल्यास त्यांना उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

करोनाची स्थिती बिकट बनत चालली आहे. नागरिकांनी अत्यंत जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. नवे रुग्ण ३००च्या वर गेले आहेत, ही शहरासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नव्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

करोना नियमावली न पाळणाऱ्यांवर पालिका व पोलीस संयुक्त कारवाई करीत आहेत. कारवाईबराबर नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. पोलिसांकडून स्वतंत्रपणेही कारवाई केली जात आहे. -सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus navi mumbai new mumbai panvel avoid establishments if they break the rules akp