९१३ सोसायटय़ा; २४५ रो हाऊस प्रतिबंधित; गावठाण, झोपडपट्टी भागात फक्त एकच ठिकाण
नवी मुंबई : शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे. एकूण ११५९ प्रतिबंधित क्षेत्र असून यात ९१३ गृहसंकुलांचा तर २४५ रो हाऊसचा समावेश आहे. तर गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त १ प्रतिबंधित क्षेत्र आहे. यावरून गृहसंकुलांत करोना संसर्ग अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र यात एकही अतिसंक्रमित (हॉटस्पॉट) नाही.
नवी मुंबईत करोनाची दुसरी लाट ओसरत असताना दैनंदिन रुग्णांची संख्या पन्नास पेक्षा कमी झाली होती. मात्र करोना निर्बंध उठविण्यात आल्यानंतर पुन्हा रुग्णवाढ होत ही संख्या दीडशेपर्यंत गेली होती. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासनाने रुग्णवाढीवर प्रतिबंध घालण्यासाठी काही निर्बंध लागू करीत शहरासाठी नियमावली जारी केली होती. यात प्रशासनाने अतिसंक्रमित होणाऱ्या सोसायटय़ांवर लक्ष केंद्रित केले आहे. वारंवार रुग्ण आढळल्यास अशा सोसायटय़ा हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या जाणार आहेत. त्या सोसायटय़ांमधील सर्वाचीच करोना चाचणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे या सोसायटीमधून नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरून कोणाला प्रवेशही करता येणार नाही. याबाबत संबंधित सोसायटय़ांनी प्रतिबंध घालावेत असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सोसायटय़ांनी नियमांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस १० हजार, दुसऱ्या वेळेस २५ हजार व तिसऱ्या वेळेपासून प्रत्येक वेळी ५० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.
पालिका प्रशासनाने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र करताना त्यांचे तीन भाग केले आहेत. यात लहान प्रतिबंधित क्षेत्र सोसायटय़ांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात शहरातील रो हाऊस तसेच तिसऱ्या टप्प्यात गावठाण व झोपडपट्टी व विभागाचा अंतर्भाव केला आहे.
शहरात सध्या एकूण ११५९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत, यात ९१३ लहान प्रतिबंधित क्षेत्र असून ती सोसायटय़ांमध्ये आहेत. रो हाऊसमध्ये २४५ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. यात त्या सोसायटीतील एक किंवा दोन घरांवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास पालिका कडक र्निबधांसह दंडात्मक कारवाईही करणार आहे. मात्र अद्याप तशी परिस्थितील एकाही सोसायटीत नाही. गृहसंकुले किंवा रॉ हाऊसमध्ये प्रतिबंधित क्षत्रे वाढत आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एकच प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या भागात संसर्ग कमी असल्याचे दिसून येत आहे.
प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधमोहिमेवर अधिक भर दिल्याने अद्याप तरी शहरात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी करोना प्रादुर्भाव कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रतिबंधित क्षेत्रे
- सोसायटय़ा : ९१३
- रो हाऊस : २४५
- गावठाण व झोपपट्टी : ०१
३ कोटींहून अधिक दंड वसूल
आतापर्यंत करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत ६५,९३७ नागरिक व आस्थापनांवर कारवाई करीत ३ कोटी २ लाख ८० हजार ६५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
एका महिन्यात ३१ विशेष दक्षता पथकांकडून ही कारवाई करण्यात करण्यात आली. ५ जून ते ४ जुलै या एका महिन्यात ४३१२ नागरिक, आस्थापनांकडून २१ लाख ३० हजार ५५० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून शहरात तीन प्रकारांत प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या विभागावर पालिका लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही करोनाची नियमावली पाळून पालिकेला सहकार्य करावे.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, पालिका
